हुतात्मा कमळाबाईची लेक आसऱ्याच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: January 17, 2015 00:42 IST2015-01-17T00:41:27+5:302015-01-17T00:42:21+5:30
आज अभिवादन : कर्नाटक-महाराष्ट्र सरकारकडून मदत नाही

हुतात्मा कमळाबाईची लेक आसऱ्याच्या प्रतीक्षेत
राजेंद्र हजारे - निपाणी -सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय मागणीसाठी निपाणी येथे मराठी अस्मिता लढा झाला. त्यामध्ये कमळाबाई मोहिते यांनी बलिदान दिले. याला ५७ वर्षे उलटूनही कर्नाटक-महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच मदत तिच्या एकुलत्या मुलीला मिळालेली नाही. उद्या (शनिवार) होणाऱ्या हुतात्मादिनीही कन्या रंजना मारुती कणसी (वय ५७) निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.
रंजना कणसी या केवळ नऊ महिन्यांच्या असतानाच निपाणीत मराठी भाषिक सीमा लढा झाला. त्यामध्ये सर्वांत पुढे असणाऱ्या कमळाबाई मोहितेंना पोलिसांच्या गोळीने लक्ष्य केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रारंभीच्या दोन गोळ्या साखरवाडीवर अजूनही सीमा लढ्याची साक्ष देणाऱ्या चिंचेच्या झाडावर लागल्या. तिसरी गोळी कमळाबार्इंना लागल्याने त्या शहीद झाल्या.
कमळाबार्इंच्या मृत्यूनंतर अनाथ रंजनाचा सांभाळ अकुबाई लक्ष्मण मगदूम (निपाणी) यांनी केला. १२ वीपर्यंत शिक्षण देऊन यमकणमर्डी येथील मारुती कणसी यांच्याशी विवाह लावून दिला. मारुती कणसी हे खासगी नोकरी करून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आजारी असून, त्यांच्यावर औषधोपचारांचा खर्च रंजना यांनाच करावा लागत आहे; पण आजपर्यंत त्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तरीही जिद्दीने त्यांनी तीन मुलींची लग्ने केली असून, दोन मुली, मुलगा व पती भाड्याच्या खोलीतच राहत आहेत.
रंजना यांचेही आता वय झाल्याने त्यांना काम करणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरभाडे देणे अशक्य बनत चालले आहे. त्यांचा मुलगा विनय कणसी याने निपाणी नगरपालिका, लोकप्रतिनिधींना भेटून घर अथवा जागा देण्याची मागणी केली आहे; पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या लढ्यातील बेळगाव येथील मारुती बेन्नाळकर यांना ११ वर्षांपूर्वीच जागा, घर व त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी शासनाने दिली आहे. त्याप्रमाणे कमळाबार्इंच्या लेकीलाही मदत मिळण्याची गरज आहे.इच्च्
दरवर्षी १७ जानेवारीला हुतात्मा दिन पाळून दिखावूपणा दाखवण्यापेक्षा आपली आई कमळाबाईच्या हुतात्म्याला न्याय द्यावा. तिच्या नावे स्मारक उभारून तिच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला देण्याची गरज आहे.
- रंजन कणसी