पती बेपत्ता, सावकारावर कारवाई करा: पत्नीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:37+5:302021-01-13T05:03:37+5:30
हुपरी : मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या बदल्यात ११ लाख रुपयांची मागणी करीत सारे घरदार लिहून घेऊनही सतत ...

पती बेपत्ता, सावकारावर कारवाई करा: पत्नीची मागणी
हुपरी : मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या बदल्यात ११ लाख रुपयांची मागणी करीत सारे घरदार लिहून घेऊनही सतत होणारी मारहाण व तगाद्याला वैतागून पती बाबासो उर्फ दाऊद कलावंत हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी राजमहंमद गुलाब डांगे (रा.आझाद गल्ली हुपरी) या खासगी सावकारावर कारवाई करावी, अशी तक्रार पत्नी शहिदा दाऊद कलावंत (रा.अंबाई नगर,रेंदाळ) यांनी रविवारी रात्री हुपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, हुपरी पोलिसांनी राजमहंमद गुलाब डांगे याच्यासह त्याच्या तीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याहिया डांगे, मुआविया डांगे व जक्रिया डांगे अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांतून समजलेली माहिती अशी की, हुपरी येथील राजमहंमद गुलाब डांगे यांच्याकडून बाबासो कलावंत यांनी सन २०१७मध्ये मुलीच्या विवाहासाठी दहा टक्के व्याजाने ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाबाबत त्यांच्या कुटुंबाला काहीही माहीत नव्हते. तरीही त्यांनी वेळोवेळी आतापर्यंत अडीच लाख रुपये दिले आहेत. काही कारणांनी त्यानंतर पैसे देणे जमले नाही. त्यामुळे डांगे व त्यांची तीन मुले व्याजासह अकरा लाख रुपये देण्यासाठी कलावंत यांच्याकडे सतत मागणी करीत असत. ११ सप्टेंबर २०१८ रोजी राजमहम्मद डांगे यांनी बाबासो कलावंत यांना धमकी देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने घर खरेदीचा नोटरी लिहून घेतला व रक्कम मागणार नाही असे त्यावेळी सांगितले होते. त्यानंतरही त्यांनी २२ डिसेंबरला व्याजाची तीन लाखांची रक्कम द्यावी, अशी मागणी करीत दोन खोल्यांचा कब्जा घेतला व धमकी देऊन निघून गेले. तेव्हापासून बाबासो हे मानसिक दडपणाखाली होते. त्यानंतरही १ जानेवारीला डांगे यांची मुले पुन्हा आली व त्यांनी बाबासो यांची गळपट्टी पकडून घर खाली करण्याची धमकी देत मारहाण केली होती. त्या भीतीने गेले तीन दिवस ते घरातून बेपत्ता झाले आहेत.