हुपरी सरपंचावर अविश्वास दाखल
By Admin | Updated: November 25, 2014 00:30 IST2014-11-25T00:17:51+5:302014-11-25T00:30:25+5:30
सदस्य सहलीवर : १७ पैकी १५ सदस्यांनी दिला ठराव

हुपरी सरपंचावर अविश्वास दाखल
हुपरी : ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याच्या कारणावरून हुपरी (ता. हातकणंगले) च्या सरपंच सुमन सर्जेराव हांडे यांच्याविरोधात तहसीलदार दीपक शिंदे यांच्याकडे १७ पैकी १५ सदस्यांनी आज, सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठरावावर सह्या करणारे सर्वच सदस्य सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
रौप्यनगरीच्या सरपंचांवर अविश्वास ठराव येण्याची गेल्या ५० वर्षांपासूनची असणारी परंपरा यावेळी सत्यात उतरत असल्याची खात्री होत आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०१२ मध्ये होऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाला ९, राष्ट्रवादी कॉँग्रेस २, शिवसेना ३ व मनसे ३, अशा जाग मिळाल्या होत्या. सरपंचपदी आवाडे गटाच्या सुमन हांडे व उपसरपंचदी बाळासाहेब रणदिवे यांची निवड करण्यात आली होती.
सरपंच हांडे यांना दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आवाडे गटाने विरोधकांना हाताशी धरून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. याबाबतची माहिती समजताच सरपंच हांडे यांनी सरपंचपदासह विरोधी गटातच उडी मारल्याने आवाडे गटाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे.
दरम्यानच्या कालावधीमध्ये समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष दौलत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांनी ग्रामपंचायत कारभार व खुंटलेला ग्रामविकास यावर बैठक घेऊन सर्वांनीच सरपंच हांडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यासाठी सर्वांनी आपल्यातले मतभेद विसरून अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज, सोमवारी सरपंच हांडे यांच्या विरोधात १७ पैकी १५ सदस्यांनी तहसीलदार दीपक शिंदे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.
दाखल केलल्या ठरावामध्ये आवाडे गट ७, शिवसेना ४, मनसे ३ व राष्ट्रवादी १ अशा १५ सदस्यांचा समावेश आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या ठरावावर सरपंच हांडे व राष्ट्रवादीच्या रेवती मनोज पाटील यांच्या सह्या नाहीत.
या अविश्वास ठरावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खास सभा बोलविण्याचा आदेश तहसीलदार शिंदे यांनी दिला आहे. (वार्ताहर)