बोगस बांधकाम परवानाबाबत कारवाईसाठी उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST2021-09-03T04:24:14+5:302021-09-03T04:24:14+5:30
कबनूर : येथील बोगस बांधकाम परवानाबाबत कारवाई आदेशाची अंमलबजावणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते शांतीनाथ ...

बोगस बांधकाम परवानाबाबत कारवाईसाठी उपोषणाचा इशारा
कबनूर : येथील बोगस बांधकाम परवानाबाबत कारवाई आदेशाची अंमलबजावणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते शांतीनाथ कामत व अजित खुडे यांनी मंगळवार (दि.७) पासून गावातील दर्गा कट्ट्यावर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना दिला आहे.
निवेदनात, कबनूर ग्रामपंचायत लेटरहेड, ग्रामपंचायत शिक्का, सरपंच, ग्रामसेवक शिक्के आणि तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्या बनावट सह्या वापरून इरगोंडा पाटील यांचे नावाने बनावट बांधकाम परवाना दस्तावेज बनवल्याचे पंचायत समिती, हातकणंगले गटविकास अधिकारी यांनी २९ जून २०२१ च्या लिखित आदेशाने स्पष्ट होते. आदेशात स्पष्ट कायदेशीर कारवाईचा आदेश आहे. तरीही आजअखेर या प्रकरणाबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून नाईलाजास्तव आम्हास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. यासाठी ७ सप्टेंबरपासून कबनूर चौक दर्गा कट्टा येथे आमरण उपोषणास बसत आहोत, असे म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया
गटविकास अधिकारी यांनी २९ जून २०२१ ला दिलेल्या आदेशाचे वाचन मासिक सभेत केले. या सभेत दिलेला बांधकाम परवाना रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे.
शोभा पोवार, सरपंच-कबनूर