शेकडो झाडे उन्मळली!

By Admin | Updated: May 10, 2015 00:42 IST2015-05-10T00:42:06+5:302015-05-10T00:42:47+5:30

विजा कडाडल्या... वीज गायब : कऱ्हाडात मुसळधार, पुसेसावळी परिसरात टपोरी गारा तर जिल्ह्यात धुळीचे लोट

Hundreds of trees have disappeared! | शेकडो झाडे उन्मळली!

शेकडो झाडे उन्मळली!

कऱ्हाड : तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळवाचा जोरदार तडाखा बसला. गारपिटीने प्रवाशांना अक्षरश: झोडपून काढले. वाऱ्यामुळे ठिकठिकाणी शेकडो झाडे उन्मळून पडले. वीजखांब जमीनदोस्त झाले. तारा तुटल्या. परिणामी, तालुक्यातील अनेक गावे रात्री उशिरापर्यंत अंधारात होती. काही ठिकाणी शिवारात वीज पडल्याच्या घटनाही घडल्या; मात्र जीवित अथवा वित्तहानीची माहिती उशिरापर्यंत प्रशासनाकडे पोहोचली नव्हती.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण दिसून येत होते. शुक्रवारी रात्री काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. मात्र, त्यावेळी वादळी वाऱ्याचा जोर कमी होता. शनिवारी दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. सूर्यप्रकाश असतानाच सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यानंतर पंधरा मिनिटांतच अंधारून आल्याने प्रवाशांसह नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील मंडईत व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. तसेच भाजी विक्रेतेही आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी वादळी वाऱ्यास सुरुवात झाली.
जोराच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी लावलेले जाहिरात व शुभेच्छा फलक कोसळले. झाडांच्या फांद्या मोडल्या. काही दुकानांचे फलक जोरदार वाऱ्यामुळे उडून जाऊन रस्त्यावर पडले. सुमारे अर्धा तास वादळी वारे सुरू होते. या कालावधीत शहरामध्ये मोठी धावपळ उडाली. रात्री सात वाजण्याच्या सुमारास शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस सुरू होता.
वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. झाडे मोडून रस्त्यावर पडल्याने काही मार्गांवरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती. तसेच झाडाच्या फांद्या कोसळल्याने काही गावात वीजखांब जमीनदोस्त झाले.
त्यामुळे अनेक गावे अंधारात होती. रात्री उशिरापर्यंत या गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. वडगाव हवेली येथे काही राहत्या घरांवरील तसेच जनावरांच्या शेडवरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाले. त्यामध्ये संबंधित ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तसेच वादळी वारे, जोराचा पाऊस व गारपिटीने शेतीपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of trees have disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.