शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: November 28, 2014 00:13 IST2014-11-27T20:59:48+5:302014-11-28T00:13:43+5:30
जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : मुरगूडमधील कन्या शाळेची जुनी इमारत धोकादायक

शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
अनिल पाटील - मुरगूड येथील कन्या शाळेची जुनी इमारत वापराविना तशीच पडून आहे. जिल्हा परिषदेने या इमारतीकडे दुर्लक्ष केल्याने ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतीच्या अवतीभोवती कन्या शाळा व जीवन शिक्षण विद्यामंदिरमधील शेकडो विद्यार्थी वावरतात, खेळतात. त्यामुळे या शेकडो चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून, जिल्हा परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की, दुर्घटना घडल्यानंतरच लक्ष देणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कन्या शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या जुन्या इमारतीला लागूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुसज्ज आणि भव्य अशी इमारत बांधली. तीन वर्षांपासून कन्या शाळा याच इमारतीमध्ये भरते. पर्यायाने जुनी इमारत वापराविना दुर्लक्षित झाल्याने खिळखिळी झाली आहे. या जुन्या इमारतीचा वापर होत नसल्याने कौले, दरवाजे, चौकटी, लाकूड सामान, लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहे. यामुळे ही इमारत कधीही कोसळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या भरत असलेली कन्या शाळा व जीवन शिक्षण विद्यामंदिर या जुन्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने लहान मुले सुटीमध्ये अगर मोठ्या सुटीमध्ये या दोन शाळेतील शेकडो विद्यार्थी समोरील मैदानावर खेळतात. खेळता खेळता हे विद्यार्थी या जुन्या इमारतीमध्ये प्रवेश करतात. कोणत्याच खोलीला दरवाजा नसल्याने अगदी आतपर्यंत ते बिनधास्तपणे वावरत असतात. त्यामुळे विद्यार्थी वावरत असतानाच, जर इमारत कोसळली, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या इमारतीच्या हक्काबाबत जिल्हा परिषद व नगरपरिषद यांच्यामध्ये न्यायालयीन वाद आहे. त्यामुळे या इमारतीकडे दुर्लक्ष झाले असेल, असे अनेक जाणकरांचे मत आहे. वेळोवेळी या मराठी शाळेतील शिक्षकांनी ही इमारत तत्काळ काढून घ्यावी, अशी मागणी वारंवार केली आहे; पण त्यांच्यावरही मर्यादा असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले आहेत.
त्यामुळे न्यायालयीन लढाई कोण जिंकायचे ते जिंकू; पण जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने पाहून ही इमारत तत्काळ जमीनदोस्त करून शेकडो विद्यार्थ्यांच्या जिवांचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.