कसबा बावड्यात शेकडो गणेशमूर्ती झाल्या तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:26+5:302021-07-14T04:27:26+5:30
कसबा बावडा परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शेकडो गणेशमूर्ती तयार झाल्या असून या महिनाअखेरीस ...

कसबा बावड्यात शेकडो गणेशमूर्ती झाल्या तयार
कसबा बावडा परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शेकडो गणेशमूर्ती तयार झाल्या असून या महिनाअखेरीस त्यांच्या रंगरंगोटीस सुरुवात होणार आहे.
गणेशाचे आगमन १० सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामास मे महिन्यापासून सुरुवात झाली. सध्या शेकडो घरगुती लहान मूर्ती तयार झाल्या आहेत. या महिनाअखेरीस त्याच्या रंगरंगोटी कामास सुरुवात केली जाईल, असे येथील मूर्तिकार महादेव बावडेकर यांनी सांगितले. सध्या शाडू आणि प्लॅस्टर अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत. मंडळांच्या मूर्तीचे काम जशा ऑर्डर येतील तसे केले जाईल, असे रोहित बावडेकर या मूर्तिकाराने सांगितले.
दरम्यान, बावड्यात पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करणारी चार ते पाच कुटुंबे आहेत. त्यामुळे बाहेरून मूर्ती विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांत इतर व्यवसाय करणारे विक्रेतेही मूर्ती विक्रीचा व्यवसाय करताना दिसत आहेत, तसेच चार-पाच तरुण एकत्र येऊन विक्रीचे स्टॉल उभारतात. मुख्य रस्त्यावर किमान २५ ते ३० मूर्तींचे स्टॉल सजलेले असतात.
फोटो : १२ बावडा गणेशमूर्ती
कसबा बावडा परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामास प्रारंभ झाला असून आतापर्यंत शेकडो गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत.
( फोटो : रमेश पाटील,कसबा बावडा )