जात नष्ट करण्यासाठी मानवतावादींनी पुढे यावे

By Admin | Updated: January 12, 2016 00:36 IST2016-01-11T23:22:03+5:302016-01-12T00:36:03+5:30

उल्का महाजन : आॅनर किलिंग विरोधी जनजागृती परिषद

Humanists should come forward to destroy caste | जात नष्ट करण्यासाठी मानवतावादींनी पुढे यावे

जात नष्ट करण्यासाठी मानवतावादींनी पुढे यावे

कोल्हापूर : जात नष्ट करण्यासाठी पुरोगामी, मानवतावादींनी पुढे यावे. शिवाय त्यांनी आंतरजातीय विवाहाला बळ द्यावे, असे आवाहन सेझविरोधी आंदोलनाच्या प्रवक्त्या व सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी येथे केले.
येथील शहीद कॉ. गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित आॅनर किलिंग विरोधी जनजागृती परिषदेत त्या बोलत होत्या. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे शहर सचिव अनिल चव्हाण, तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे, वर्ल्ड फेडरेशन आॅफ यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे प्रमुख उपस्थित होते.
महाजन म्हणाल्या, जातीच्या नावावर संघटना चालविणाऱ्या परंपरा, चालीरीती मान्य आहेत की, संविधान व राजर्षी शाहू महाराज मान्य आहेत, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. इंद्रजित कुलकर्णी व मेघा यांच्या खुनानंतर या सर्व संघटना शांत बसल्या. हे प्रतिगाम्यांच्या पथ्यावर पडणारे कृत्य आहे. या सर्व गोष्टींमागे पितृसत्ताक व्यवस्था हे मूळ कारण आहे. आजची तरुणाई नव्या वाटा शोधत आहे.
अशावेळी जातीवर माणूस चांगला अथवा वाईट ठरविणे हे वाईट आहे. जातिअंत, आंतरजातीय विवाहातील अडचणी दूर केल्या पाहिजेत.जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे म्हणाले, २१व्या शतकामध्ये देश महासत्ता बनविण्याची भाषा करताना जात, धर्म, अंधश्रद्धा, आदींपेक्षा व्यक्तीतील गुण महत्त्वाचे आहेत.
विचारांमध्ये प्रगती होणे आवश्यक आहे. एक सज्ञान मुलगा, मुलगी स्वइच्छेने विवाहासाठी एकमेकांची निवड करत असतील, तर त्याला पाठबळ दिले पाहिजे.
समाजाने त्यांना स्वीकारले पाहिजे. समाजोपयोगी
पुरोगामी विचारधारांना पोलीस दलाकडून सहकार्य केले जाईल.कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आकाश कांबळे व सोनाली कल्याणकर यांचा आंतरजातीय विवाह लावण्यात आला. सत्यशोधक मंगलाष्टका व प्रतिज्ञा घेऊन, फुले टाकून विवाह करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Humanists should come forward to destroy caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.