हलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरश: धुमाकूळ

By Admin | Updated: January 21, 2015 23:57 IST2015-01-21T23:36:01+5:302015-01-21T23:57:36+5:30

१२ जण जखमी : जखमींत सहा बालकांचा समावेश

Hulkarna athletic scurvy | हलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरश: धुमाकूळ

हलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा अक्षरश: धुमाकूळ

हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. या कुत्र्याने सहा बालकांसह १२ जणांचा चावा घेऊन जखमी केले. काल, मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे हलकर्णीसह पंचक्रोशीत घबराट पसरली आहे. ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी तेरणीकडून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने येथील तेरणी रोड, बस स्टँड परिसर, पाटील गल्ली व भीमनगर येथे धुमाकूळ घातला. लहान बालकांसह समोर दिसेल त्या माणसाचा त्याने चावा घेतला. नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चंदनकुडच्या दिशेने पळून गेले. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्यांची नावे व वय कंसात : अमोल चिदानंद ढंगणावर (वय ६), आेंकार दुंडाप्पा पाटील (४), जयव्वा कल्लाप्पा भोसले (४०), किरण केंप्पाना पाटील (४), प्रीतम संतोष सुरनाईक (५), संभोदन संजय लब्यागोळ (२), राहुल गणपती पाटील (२३), मनीषा प्रकाश इंगळे (२४), मायव्वा सागर कांबळे (५०), सुशीला दुंडाप्पा धनगर (६२), दुंडाप्पा बाळाप्पा पाटील (६०), मायव्वा राजू धनगर (४) यांचा समावेश आहे.जखमींना तत्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. याठिकाणी डॉक्टर व लस उपलब्ध नसल्याने जखमींना रात्री गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणीही पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जखमींना सीपीआरला पाठविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध न झाल्याने जखमींचे नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ‘त्या’ पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी हलकर्णीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)


पंचायत समितीच्या सभेत पडसाद
हलकर्णी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून निष्पाप बालकांसह १२ जणांना जखमी केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद पंचायत समितीच्या आज, बुधवारच्या मासिक सभेत उमटले.
अनेक वर्षांपासून मागणी करूनही हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक अथवा पर्यायी व्यवस्था झाली नाही. या रुग्णालयात डॉक्टर नाही आणि ‘रेबीज’ लससुद्धा उपलब्ध नसल्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची हेळसांड झाली. याला जबाबदार कोण ? आता तरी या रुग्णालयाला डॉक्टर द्या, अशी मागणी बाळेश नाईक यांनी केली. अमर चव्हाण व अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनीही त्यांच्या मागणीस दुजोरा दिला.
हलकर्णी येथील घटना आणि पंचक्रोशीतील रुग्णांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची हलकर्णी केंद्रात बदली करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Web Title: Hulkarna athletic scurvy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.