हातकणंगलेकरांमुळे मराठी समीक्षा समृध्द
By Admin | Updated: January 1, 2015 00:14 IST2014-12-31T22:43:35+5:302015-01-01T00:14:52+5:30
सदानंद मोरे : ‘सांगली भूषण’ पुरस्कार प्रदान

हातकणंगलेकरांमुळे मराठी समीक्षा समृध्द
सांगली : आपल्याकडील मराठी साहित्यिकांचे इंग्रजीचे वाचन कमी असते; परंतु प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या इंग्रजी व मराठीच्या सखोल अभ्यासामुळे मराठी समीक्षा खऱ्या अर्थाने समृध्द झाली, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले. येथील विश्वजागृती मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ‘सांगली भूषण पुरस्कार’ डॉ. मोरे यांच्याहस्ते ज्येष्ठ समीक्षक प्रा. हातकणंगलेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गणेशनगर येथील रोटरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. मोरे म्हणाले की, कनिष्ठ व्यक्तींना ज्येष्ठ व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी ‘सांगली भूषण’ पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे. मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांना साहित्यप्रेमींपर्यत पोहोचविण्याचे कार्य प्रा. हातकणंगलेकर यांनी केले. विशेष म्हणजे ‘जीएं’च्या पुण्यतिथीलाच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हा योगायोगच आहे. प्रा. हातकणंगलेकरांनी नवोदित साहित्यिकांमधील लेखनशैली ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले. मागील कित्येक वर्षांपासून प्रा. हातकणंगलेकर आणि सांगली हे समीकरणच निर्माण झाले आहे. त्यामुळेच आजकाल सांगलीला समीक्षकांच्या नावाने ओळखले जाते.
डॉ. मोरे यांच्याहस्ते प्रा. हातकणंगलेकर यांना ‘सांगली भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीर गाडगीळ होते. विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैजनाथ महाजन आणि प्रा. अविनाश सप्रे यांनी प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. कार्यक्रमास प्रा. तारा भवाळकर, प्रा. रेवती हातकणंगलेकर, भैय्यासाहेब परांजपे, मधू वझे आदींसह सांगलीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संत साहित्याचा वारसा जपा
तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर संत साहित्याचा पगडा होता. सध्या आधुनिक साहित्याचा प्रवाह असला तरी, त्याला फार मोठा इतिहास नाही. त्यामुळे आधुनिक साहित्यिकांनी संत साहित्याचा वारसा जपावा, असे आवाहन डॉ. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.