बाजार समित्यांमधील बांडगुळं किती वर्षे सांभाळायची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:00+5:302020-12-13T04:39:00+5:30
इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा ...

बाजार समित्यांमधील बांडगुळं किती वर्षे सांभाळायची
इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा त्यांचा प्रकार आहे. तसेच बाजार समित्या राजकीय बगलबच्च्यांच ताब्यातच राहवीत असा काहींचा अट्टाहास आहे. मात्र, ही बांडगुळं शेतकऱ्यांनी किती वर्षे सांभाळायची ? असा सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला काहींची दृष्ट लागली आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी राज्यभरात विधेयकांवर दुग्धाभिषेक घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने यापूर्वीच मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रॅक्ट शेतीला सुरुवात केली आणि आता केंद्र सरकारने मंजूर केलेेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आव आणत आहेत. विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार असून शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार उपस्थित होते.
चौकट - राजू शेट्टींनी विद्यापीठ बदलले असेल. आमची सुरुवात शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या विद्यापीठातून झाली आहे, परंतु कदाचित शेट्टींनी विद्यापीठ बदलून शरद पवार यांच्या विद्यापीठात प्रवेश घेतला असेल. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम बदलल्याने ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असतील, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.