इमारतीच्या जागेच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजून किती वर्षे?
By Admin | Updated: July 9, 2015 00:23 IST2015-07-09T00:23:20+5:302015-07-09T00:23:20+5:30
करवीर पंचायत समिती : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन नाही

इमारतीच्या जागेच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजून किती वर्षे?
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीच्या इमारत जागेसाठी मूळ जागामालक यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिले गेल्याने करवीर पंचायत समितीच्या इमारतीच्या जागेबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अजून किती वर्षे चालू राहणार? असा प्रश्न पंचायतचे सदस्य आणि करवीरच्या जनतेत उपस्थित होऊ लागला आहे. गेली अनेक वर्षे पंचायत समिती नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.
पंचायत समितीच्या इमारतीला जागा मिळावी, यासाठी सोमवारी सभापती पूनम महेश जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक, सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप टिपुगडे, तानाजी आंग्रे, स्मिता गवळी, अरुणिमा माने, सरदार मिसाळ, आदी सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अध्यक्षा विमल पाटील यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली. सध्या आहे ही जागा किंवा जिल्हा परिषदेसमोरील जागा मिळावी, अशी मागणी केली.
या जागेबाबत जिल्हा परिषदेसमोरील जागा व सध्या पंचायतची इमारत आहे, त्या जागेबाबत विचार सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केल. मात्र, ठोस आश्वासन दिले नसल्यामुळे जागेचा प्रश्न सुटायला अजून किती दिवस लागतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात झाली आहे. करवीर पंचायत समितीला जागा मिळावी म्हणून गेली अनेक वर्षे सदस्यच सभागृहात आवाज उठवत आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे लक्ष गेले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने या संदर्भात जागामालक यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार काही तडजोड झाल्यास सध्या आहे त्या जागेवर इमारत होऊ शकते. तडजोड नाही झाली तर मात्र जिल्हा परिषदेला आपल्या मुख्यालयासमोरील जागा पंचायत समितीला द्यावी लागेल. करवीरमधील जि. प. व पंचायत समिती सदस्यांनी या जागेबाबत नेहमी पाठपुरावा सुरू ठेवला, तरच या जागेचा प्रश्न सुटेल; अन्यथा जागेच्या चर्चेचे गुऱ्हाळ वर्षानुवर्षे असेच चालू राहील. (प्रतिनिधी)
नेत्यांनी लक्ष घालावे
करवीर पंचायत समिती इमारतीच्या जागेसाठी माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रदीप नरके व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातल्यास हा प्रश्न निकालात निघेल, अशी भावना करवीरच्या जनतेची आहे.