किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:50+5:302021-06-18T04:16:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतच्या सूचना पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या ...

How many teachers want to go to school, brother? | किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबतच्या सूचना पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने अनलॉकच्या चौथ्या स्तरामध्ये सध्या कोल्हापूर जिल्हा आहे. त्यामुळे येथील शाळा तूर्त तरी ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबतची सूचना माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी तयारी केली आहे. समूह अध्यापनाअंतर्गत विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून त्यांना शिक्षण देण्याचा पर्यायही शिक्षण विभागाने सुचविला आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर आहेत, तेथील शिक्षकांनी घरातूनच ऑनलाईन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्ष प्रारंभाबाबत दि. १४ जूनच्या पत्राद्वारे काही सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीची टक्केवारी निश्चिती केली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषद शाळा -३०२६

विनाअनुदानित शाळा - १४०

शिक्षक -३५०००

शिक्षकेतर कर्मचारी -२१५७

संचालकांचे पत्र काय?

शिक्षण संचालकांच्या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते नववी, अकरावीचे ५० टक्के आणि दहावी, बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या १०० टक्के उपस्थिती राहील, असे म्हटले आहे.

जिल्हा परिषदेचे पत्र?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण द्यावे. मात्र, शाळेतील उपस्थितीच्या टक्केवारीची शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता.

शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

कोरोनाच्या ड्यूटीमुळे एकूण शिक्षकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षक हे शाळांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षण संचालकांच्या सूचनांची माहिती देणारे पत्र काढण्याची आवश्यकता वाटत नाही.

-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी

शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत प्राथमिक शाळांना सूचना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षकही कोरोना ड्यूटीवर आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शाळांना पत्र पाठविण्यात येईल.

-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

शिक्षकांची कसरत

शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार शिक्षकांच्या उपस्थितीबाबत कार्यवाही व्हावी. त्याबाबतचे पत्र शाळांना पाठविण्यात यावे. त्यामुळे शाळा, शिक्षकांमधील संभ्रमावस्था दूर होईल.

-संतोष आयरे

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता शिक्षण संचालकांच्या आदेश योग्य वाटतो. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत शिक्षण विभागाने शाळांना लेखी सूचना द्याव्यात.

-राजेश वरक

Web Title: How many teachers want to go to school, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.