मंडलिकांना पावणेसहा लाख मते कशी पडली?
By Admin | Updated: June 13, 2016 00:51 IST2016-06-13T00:43:36+5:302016-06-13T00:51:21+5:30
धनंजय महाडिक : कधी कुणाला चहा दिला नसल्याचाही टोला

मंडलिकांना पावणेसहा लाख मते कशी पडली?
कोल्हापूर : कोणास एक कप चहा न दिलेले आणि ओळख नसलेल्या संजय मंडलिक यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत पावणेसहा लाख मते कशी पडली, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी केला. मला तीन लाख मताधिक्याने निवडून येण्याचा आत्मविश्वास होता. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळेच ४० हजार मतांनी विजयी झालो, असे त्यांनी सांगितले.
येथील दसरा चौकातील जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या जैन जागृती सेंटरच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. सेंटरच्या केंद्रीय बोर्डाचे अध्यक्ष संजय शहा अध्यक्षस्थानी होते. आॅल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, रमेश मोरबिया, किशोर शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘टॉप थ्री’ खासदारांमध्ये निवड झाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार झाला. खासदार महाडिक म्हणाले, सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम केले, गरजूंना मदत केली. शेळी-मेंढी वाटप, कृषी प्रदर्शन, झिम्मा-फुगडी असे उपक्रम घेतले; परंतु, मोदीच्या लाटेमुळे जैन समाजातील काही जणांनी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळेच मंडलिकांना तितकी मते पडली. मी खासदार झाल्यानंतर दोन वर्षांत कोल्हापूर जिल्हा, राज्याचे विविध प्रश्न संसदेत अभ्यासपूर्ण मांडले म्हणूनच ज्यांनी मला मते टाकली त्यांचे मत वाया गेले नाही. त्यामुळे गेल्यावेळी मला ज्यांनी मदत केली नाही, त्यांनी पुढील वेळी मला मदत करावी. जैन समाजाने आपल्या समाजातील गरजू विद्यार्थ्यांना ४३ कोटी रुपयांची बिनव्याजी कर्ज दिले आहे, हे कौतुकास्पद आहे; परंतु, जैन सेंटरने इतर समाजातील गरीब विद्यार्थ्यांना कमीत कमी चार लाखांची तरी मदत करावी.
यावेळी ललित गांधी, जयेश ओसवाल, नूतन अध्यक्ष कांतीलाल ओसवाल यांची भाषणे झाली. त्यानंतर ओसवाल यांनी मावळते अध्यक्ष देवीचंद ओसवाल यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. शेफाली मेहता यांनी सूत्रसंचालन केले. विजय शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
महाडिकांचा वशिला..
इंटरनेटच्या माध्यमातून सन १९५२ नंतर देशातील कोणत्या खासदारांनी किती प्रश्न विचारले, त्याची उपस्थिती किती होती या संबंधीची कुंडली मिळते. त्यामुळे ‘टॉप थ्री’ खासदारात येण्यासाठी महाडिकांनी वशिला लावला असेल, असे कोणास वाटत असेल तर ते खोटे आहे. नावाचा लौकीक होण्यासाठी सभागृहात चांगले काम करणे गरजेचे आहे किंवा सभागृहाबाहेर मारामारी करावी (उपरोधाने) असे दोन पर्याय असतात. मी कोल्हापूरचा असूनही मारामारी करू शकत नव्हतो, त्यामुळे संसदेत प्रभावी काम करून नावलौकीक मिळविला, असे महाडिक सांगताच एक हशा पिकला.
कृती समिती तयार
होऊ नये म्हणून..
वारंवार पाठपुरावा करून शहराच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीज मंजूर करून घेतला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींची तरतूद करून घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. हे पहिल्यादांच सांगितले असते तर ‘हे होता कामा नये’ म्हणत कृती समिती तयार झाली असती, असा उपरोधिक टोला महाडिक यांनी लगावला.