उद्योग बंद करायचे तर ‘गोकुळ’ची निवडणूक कशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:58+5:302021-04-16T04:24:58+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार ...

उद्योग बंद करायचे तर ‘गोकुळ’ची निवडणूक कशी
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार उद्योग बंद करा, असे आवाहन मंत्री करत आहेत. मग ‘गोकुळ’ची निवडणूक कशाला हवी, असा प्रश्न भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे नियम सांगितले ते पायदळी तुडवण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टता कमी आणि संभ्रमावस्थाच जास्त आहे. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काही निर्बंध शिथील केले, हे समजू शकतो. कारण ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित आहे. पण ‘गोकुळ’ची निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या अखत्यारितील विषय आहे. हे प्राधिकरण राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे घेता आली असती. पण राजकीय दबावापोटी या निवडणुकीचे काही नियम तयार करण्यात आले, पण या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का नाही, हे कोण पाहणार? ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावे होत आहेत. पण सत्तारूढ गटाच्या मेळाव्यांबद्दल लगेच तक्रार करणाऱ्यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळतो की नाही, याचे आत्मचिंतन करावे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.