समीर देशपांडे कोल्हापूर : या चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात जिल्ह्याचं प्रशासन एकवटलेले. गेल्या महिन्याभरात या सर्वांचाच कस लागलेला आणि येणाऱ्या पंधरा दिवसांत अधिकच लागणार आहे. अवघ्या महिन्याभरात सर्किट बेंचची उभारणी ते उद्घाटन समारंभ, हा प्रचंड जल्लोषी कार्यक्रम संपतोय, तोपर्यंत महापूर उंबरठ्यावर आणि पंचगंगेची पातळी एकीकडे कमी येऊ लागली असताना, आता राज्योत्सव असलेल्या गणेशोत्सव काळात अधिक दक्ष राहणे ओघानेच आले. पायाला भिंगरी बांधलेल्या प्रशासनाचे हे चार प्रातिनिधीक अधिकारी.
यांच्या डोक्यात फक्त पंचगंगेची पातळीअमोल येडगे, जिल्हाधिकारीचोवीस तास अलर्ट मोडवर असलेले तरुण अधिकारी. सर्किट बेंचच्या उभारणीसाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा उत्तम समन्वय साधला. बरे यातील अनेक गोष्टी फारशा जाहीर न करता करायच्या होत्या. त्यातही ते यशस्वी झाले. देशाच्या सरन्यायाधीशांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण भर पावसात कार्यक्रमाला कोल्हापुरात. कार्यक्रम नेटका झाला. तोपर्यंत पंचगंगेची पातळी वाढू लागली आणि रात्रीच येडगे कसबा बावड्याच्या रस्त्यावर उतरले, दुसऱ्याच दिवशी शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करून आले. निवडणुकांच्या आधीच गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याची तयारी असताना साहजिकच जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आलीच.
शहर स्वच्छतेपासून, पूरग्रस्तांच्या स्थलांतरापर्यंतके. मंजुलक्ष्मी, आयुक्त, कोल्हापूर महापालिकासर्किट बेंच उद्घाटनाची तारीख जवळ आली आणि यांची धावपळ वाढली. एक तर पाऊस. महावितरणनं झाडांच्या फांद्या कापलेल्या. शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता करण्याचे मोठे आव्हान. त्यात शिवाजी विद्यापीठापासून अंबाबाई मंदिरापर्यंतच्या ‘व्हीआयपी’ रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेवर. मंजुलक्ष्मी यांनी तब्बल हजारावर कर्मचारी रस्त्यावर उतरवले. दुभाजकांच्याजवळच्या स्वच्छतेपासून ते कचरा उचलण्यापर्यंत. सर्किट बेंचचे उदघाटन झाले आणि शहराच्या आजूबाजूला पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याचे पाणी पसरायला सुरुवात झाली. सुतारवाड्यापासून अनेक ठिकाणचे स्थलांतर सुरू झाले. मंजुलक्ष्मी यांनी थेट दसरा चौकातील मठात धाव घेऊन पूरग्रस्तांची भेट घेतली. आता गणेशोत्सवामधील शहरातील अनेक अडचणींचा सामना त्यांच्या टीमला करावा लागणार आहे.
नो लेझर, नो डीजेयोगेशकुमार गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षकविमानतळापासून ते अंबाबाई मंदिर, सर्किट बेंच भाऊसिंगजी रोडपासून कार्यक्रमस्थळापर्यंत सगळीकडे चोख भर पावसात पोलिस बंदोबस्त, सरन्यायाधीशांपासून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंतच्या सर्वांसाठीचा बंदाेबस्त, त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांचा राबता. याच दरम्यान शहरात प्रचंड वाहतूककोंडी. त्यासाठीही पोलिसांना रस्त्यावर थांबावे लागलेले. हे काम कमी होतेय तोपर्यंत पूरस्थितीमुळे वाहतूक वळवावी लागलेली. अशातच गणपतीच्या आगमन मिरवणुका. गुन्हेगारांची हद्दपारी आणि गणपती मंडळाच्या प्रबोधनासाठीचा उपक्रम. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत असताना यांच्या डोक्यात आता ‘फक्त नो लेझर, नो डीजे’ हेच शब्द आहेत.
कुठले रस्ते बंद, पर्यावरणपूरक विसर्जनकार्तिकेयन एस., सीईओ, जिल्हा परिषदनेहमी ॲक्टिव्ह आणि कधीही फिरतीसाठी तयारी असलेले कार्तिकेयन बाराही तालुक्यातील नद्या पात्राबाहेर आल्याने चिंतेत. आपल्या विभागप्रमुखांना सक्त सुचना देवून आपत्कालीन परिस्थितीसाठी अंगात १०४ ताप असतानाही तयार असणारे. जिल्ह्यातील कुठले रस्ते बंद, शाळा बंद अशा परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारे. आता पाऊस कमी झाल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झालेले.