सभागृहास घरफाळा वाढ नाकारण्याचा अधिकार

By Admin | Updated: July 11, 2015 00:07 IST2015-07-11T00:07:35+5:302015-07-11T00:07:35+5:30

कोल्हापूर महानगरपालिका : ४० टक्के वाढीचा प्रस्ताव, १ एप्रिल २०१६ पासून प्रस्तावित वाढ

The House of Representatives has the right to reject property growth | सभागृहास घरफाळा वाढ नाकारण्याचा अधिकार

सभागृहास घरफाळा वाढ नाकारण्याचा अधिकार

कोल्हापूर : शहरातील जमीन व मिळकती रेडीरेकनरशी संलग्नित करून घरफाळ्यात वाढ न करण्याचा निर्णय २०११ मध्ये महापालिकेच्या सभागृहाने घेतला. त्यामुळे दरवर्षीच्या रेडीरेकनर वाढीमुळे १ एप्रिल २०१६ पासून
घरफाळ्यात ४० टक्के वाढ अपेक्षित आहे. तत्पूर्वी, फेबु्रवारी २०१६ मध्ये होणाऱ्या महासभेपुढे हा प्रस्ताव आल्यानंतर नगरसेवकांना बहुमताने ही दरवाढ नाकारण्याचा अधिकार आहे. त्यावेळी ही वाढ ‘जैसे थे’ ठेवणे किंवा इतर पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो.
महानगरपालिकेने पूर्वी करपात्र मूल्यांवर घरफाळा आकारण्याची पद्धत बंद करून सन २०११-२०१२ पासून भांडवली मूल्यांवर घरफाळा आकारणी सुरू केली. याचा परिणाम म्हणून शहरातील मिळकतींच्या घरफाळ्यात मोठी वाढ झाली. भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारणीसाठी रेडीरेकनर दराचा आधार घेतला जातो; परंतु तसा निर्णय घेताना एकदा घरफाळा ठरला की त्यात पुढची पाच वर्षे कोणताही बदल करता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले.
सध्या रेडीरेकनरचे दर वाढले असले तरी महापालिकेने भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळ्यात पुढील पाच वर्षे कोणताही बदल करायचा नाही, असा निर्णय त्यावेळी महासभेने घेतला.
रेडीरेकनरच्या दराशी घरफाळा जोडला गेल्यानंतर दरवर्षी यामध्ये होणाऱ्या किमान १० ते १५ टक्के दरवाढीचा फटका घरफाळा वाढीच्या रूपाने बसणार होता. यानंतर मोकळ्या जागा व मिळकतींच्या किमतीनुसार शहरातील मिळकतींच्या घरफाळ्यातही वाढ झाली असती. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर मिळकतधारकांचा घरफाळा या मधल्या काळात वाढला नाही.
याची एकत्रित अंमलबजावणी प्रत्यक्षात १ एप्रिल २०१६ च्या घरफाळा बिलात केली जाणार, हे त्यावेळी निश्चित झाले. मात्र, महासभेला ही दरवाढ नाकारण्याचा किंवा दुसरा पर्याय स्वीकारण्यासह पुढील पाच वर्षांसाठी ठोक घरफाळा वाढविण्याचा अधिकार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


रेडीरेकनरच्या दरानुसार घरफाळा करात वाढ न केल्यानेच १ एप्रिल २०१६ नंतर ही वाढ होणार आहे. मात्र, तत्पूर्वी होणाऱ्या महासभेला हा प्रस्ताव नाकारण्याचा किंवा त्यावेळी दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याचा अधिकार आहे.
- संजय भोसले, इस्टेट आॅफिसर, महापालिका.

Web Title: The House of Representatives has the right to reject property growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.