दंडव्याजासह घरफाळ्याची वसुली
By Admin | Updated: September 5, 2015 00:09 IST2015-09-05T00:09:18+5:302015-09-05T00:09:18+5:30
आयुक्तांची माहिती : चालू वर्षाच्या घरफाळा बिलातूनच वसुलीच्या नोटिसा

दंडव्याजासह घरफाळ्याची वसुली
कोल्हापूर : घरफाळ्याच्या थकबाकीवरील दंडव्याजात महापालिकेतील ‘दानशूर’ अधिकाऱ्यांनी दिलेली सूट मिळकतधारकांकडून वसूल करण्याच्या निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला असून, चालू वर्षाच्या घरफाळा बिलातूनच वसुलीच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. यासाठी चारही विभागीय कार्यालयांत विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, आवश्यकता वाटल्यास सुनावणीही घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
घरफाळा थकबाकीवरील दंडव्याजात कोणालाही सूट दिली जाणार नाही. गेल्या चार वर्षांत ज्यांचे दंडव्याज माफ झाले, त्यांच्याकडून ते वसूल केले जाणार आहे. चालू मागणी बिलात या सूट देण्यात आलेल्या रकमा थकबाकीच्या स्वरूपात समाविष्ट करून नवीन मागणी बिले देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्यांच्या बिलात सूट देण्यात आलेल्या दंडव्याज रकमेबाबत शंका असेल, तर त्यावर चारही विभागीय कार्यालयांत विशेष कर्मचाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन मिळकतधारकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. काही मोठ्या रकमांबाबतीत उपायुक्तांमार्फतही सुनावणी घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
तीन कोटींची सूट दिल्याचे स्पष्ट
महानगरपालिकेच्या सात अधिकारी व ६९ कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत २ कोटी ९१ लाख रुपयांचे दंडव्याज माफ केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. एखाद्या व्यक्तीने घरफाळा वेळेत भरला नाही आणि त्यामुळे थकबाकी राहिली तर थकबाकीवर अठरा टक्के दंडव्याज आकारण्यात येते; परंतु हे दंडव्याज जास्त होत असल्याने ते कमीत कमी करावे, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात होती; परंतु प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली होती.
बिलंदर अधिकारी कारणीभूत
घरफाळा विभागात काही विशिष्ट अधिकाऱ्यांचाच जास्त इंटरेस्ट असायचा. एक अधिकारी आजही घरफाळा विभागात काम करण्यास इच्छुक होता. त्यामुळे त्याने सध्याच्या अधिकाऱ्यास बदनाम करण्याच्या हेतूने एक प्रकरण उघडकीस येईल यासाठी प्रयत्न केले; परंतु हा अधिकारीही शेवटी घोटाळ्यात सापडला. आपल्याला पाहिजे तशी कायद्यातील पळवाट शोधण्यात हा ‘कायदेपंडित’ विशेष पटाईत आहे. त्यामुळे वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी बसली की मग आपल्याला पाहिजे तसे कामकाज करण्यात तो मोकळा असायचा.