पोलिसाच्या मुलाकडून हॉटेल व्यावसायिकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:46+5:302021-07-28T04:25:46+5:30
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पोलिसाच्या मुलाने एका हॉटेल मालकास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली, या ...

पोलिसाच्या मुलाकडून हॉटेल व्यावसायिकास मारहाण
कोल्हापूर : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून पोलिसाच्या मुलाने एका हॉटेल मालकास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने हॉटेल मालक उदयसिंग जवाहरलाल परदेशी (वय ४२ रा. नागाळा पार्क) हे जखमी झाले. याबाबत पप्पू भोसले (वय २६ रा. कसबा बावडा) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी परदेशी यांच्या हाॅटेलमध्ये चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांनी संशयिताविरोधात चोरीची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी सायंकाळी परदेशी हे महावीर उद्यान समोरील आपल्या हॉटेलमध्ये साफसफाई करत होते. त्यावेळी तेथे पप्पू भोसले आला, त्याने चार दिवसांपूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरुन परदेशी याच्याशी वादावादी केली. त्यावेळी ‘पोलिसात तक्रार दिली म्हणून मला काही फरक पडत नाही, माझे वडील पोलीस आहेत, तुला काय करायचे ते कर पण तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत परदेशी यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत परदेशी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.