हॉटेल सुखसागरची तोडफोड, मालकास मारहाण
By Admin | Updated: June 15, 2014 01:54 IST2014-06-15T01:11:57+5:302014-06-15T01:54:57+5:30
मंदिर परिसरातील झाडे तोडल्याच्या रागातून कृत्य

हॉटेल सुखसागरची तोडफोड, मालकास मारहाण
कोल्हापूर : महादेवाच्या मंदिरासमोरील झाडे तोडल्याच्या रागातून २० ते २५ जणांच्या जमावाने आज, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शाहूपुरी-लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल सुखसागरवर हल्ला चढवीत साहित्याची तोडफोड केली. यावेळी हॉटेलमालक बालकृष्ण शेट्टी (रा. ई वॉर्ड, शाहूपुरी) यांनाही मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, हॉटेल सुखसागरच्या पश्चिमेला ओढावरचा नवा पूल आहे. या दोन्हींच्या मध्ये महापालिकेच्या मालकीची रिकामी जागा आहे. याठिकाणी महादेवाचे मंदिर असून त्याशेजारी उंबराचे व सुकलेले अशी दोन झाडे आहेत. त्यांना लागूनच विद्युत खांब आहे. या खांबावरून सुमारे ३३ हजार मेगावॅटची विद्युतवाहिनी गेली आहे. तिला दोन्ही झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. पुढील धोका ओळखून हॉटेलमालक शेट्टी यांनी आज दुपारी ही दोन्ही झाडे कापून टाकली. हा प्रकार परिसरातील स्थानिक नागरिकांना समजला. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल परिसरातील संतप्त महिला व तरुणांचा जमाव घटनास्थळी आला. मंदिरासमोरील झाडे तोडल्याचे पाहताच संतप्त जमावाने हॉटेलवर तुफान दगडफेक केली. हॉटेलबाहेरील कुंड्या व आतील साहित्याची तोडफोड केली. जमावाने हॉटेलमालक शेट्टी यांनाही बेदम मारहाण केली. हा प्रकार हाकेच्या अंतरावर असलेल्या लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगिवले. ही घटना शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत असल्याने परिसरातील महिला व तरुणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्याकडे हॉटेलमालक शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शेट्टी यांच्याकडूनही पोलिसांनी लेखी लिहून घेतले. दरम्यान, महापालिका हद्दीतील झाडे शेट्टी यांनी कोणतीही परवानगी न घेता परस्पर तोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर हॉटेल बंद ठेवण्यात आले होते; तर पोलिसांच्या गस्तीची व्हॅन हॉटेलसमोर तळ ठोकून होती. (प्रतिनिधी)