तब्बल ११० दिवसांनी खुलली हाॅटेल, रेस्टाॅरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST2021-07-27T04:24:53+5:302021-07-27T04:24:53+5:30
गेल्या लाॅकडाऊननंतर राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी होतो. त्यामुळे अशी गर्दी होणारी हाॅटेल्स, माॅल्स, रेस्टाॅरंट बंद ठेवण्याचे ...

तब्बल ११० दिवसांनी खुलली हाॅटेल, रेस्टाॅरंट
गेल्या लाॅकडाऊननंतर राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी होतो. त्यामुळे अशी गर्दी होणारी हाॅटेल्स, माॅल्स, रेस्टाॅरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतरही या हाॅटेल्सना परवानगी देण्यात आली. केवळ पार्सल सुविधा पुरविण्याच्या अटीवर ही सेवा सुरू झाली. यात हाॅटेलमध्ये बसून खवय्यांना पदार्थांचा आस्वाद घेता येत नव्हता. त्यानंतर दुसरी लाट आली. ही लाटही ओसरू लागली आहे. त्यामुळे शासनाने शहरासह जिल्ह्यातील विविध हाॅटेल्सना सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ५० टक्के आसन क्षमतेने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा लोकांना पुरविण्याची परवानगी दिली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी खवय्यांनी हाॅटेल्स, रेस्टाॅरंट उघडल्यानंतर चांगला प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी जेवण, नाश्त्याकरिता खवय्यांना प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र होते. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे स्वत: मालक मंडळी ग्राहकांना सेवा देत असल्याचे चित्र बहुतांशी हाॅटेल्समध्ये होते.
कर्मचाऱ्यांची कमतरता
वर्षानुवर्षे एकाच हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गामुळे काही दिवस हाताला काम नव्हते. त्यामुळे हे कर्मचारी आपआपल्या गावाकडे परतले होते. विशेषत: आजरा, चंदगड, सिंधुदुर्ग, आदी भागातील बहुतांशी कर्मचारी जिल्ह्यातील विविध हाॅटेल्समध्ये काम करीत आहेत. गेल्या ११० दिवसांनी हाॅटेल्स सुरू झाल्यानंतर यातील ८० टक्केहून अधिक कर्मचारी पुरामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे स्वत: मालक व त्यांची कुटुंबीय ग्राहकांना सेवा देत होते.
कोट
कोरोना संसर्गासंबंधी अटी, शर्ती पाळूनच सर्व हाॅटेल्स सुरू करण्याच्या सूचना आम्ही सभासदांना दिल्या आहेत. मात्र, सध्या दिलेली वेळ अपुरी आहे. ग्राहक वर्गालाही ती गैरसोईची आहे. त्यामुळे शासनाने सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत हाॅटेल, रेस्टाॅरंट उघडण्यास परवानगी द्यावी.
सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हाॅटेल मालक संघ,
हाॅटेल्स, रेस्टाॅरंट संख्या - ८००
कर्मचारी संख्या - १०,०००