घर सांभाळत रुग्णसेवा हे कौतुकास्पद
By Admin | Updated: May 13, 2015 00:52 IST2015-05-13T00:01:52+5:302015-05-13T00:52:29+5:30
अरूंधती महाडिक : ‘सीपीआर’साठी खासदार कमी पडणार नाहीत, जागतिक परिचारिका दिन

घर सांभाळत रुग्णसेवा हे कौतुकास्पद
कोल्हापूर : कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडून वेळेवर उपचार करून रुग्णांना तुम्ही लवकरात लवकर तंदुरुस्त करून घरी पाठवता हे कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी परिचारिकांबद्दल गौरवोद्गार
काढले. त्या मंगळवारी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्यावतीने आयोजित जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार समारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न, निधीचा जो प्रश्न असेल त्यासाठी खासदार धनंजय महाडिक कमी पडणार नाहीत, असे आश्वासनही दिले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे, ‘सीपीआर’चे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ए. एस. चौगुले, अनिल लवेकर, सुमती जोशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधिसेविका वंदना व्ही. शहाणे अध्यक्षस्थानी होत्या.
अरूंधती महाडिक म्हणाल्या, एखादा रुग्ण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, तेव्हा रुग्णाच्या नातेवाइकांचे परिचारिकांवर दडपण असते. तरीही परिचारिका न डगमगता आपली सेवा बजावतात. धनंजय महाडिक यांच्या प्रचारावेळी मी फिरत असताना जनतेला दोन खासदार देणार असे सांगत होते; त्यामुळे माझे पती धनंजय महाडिक व मी पूर्णवेळ समाजसेवेसाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर ‘सीपीआर’चे अनेक प्रश्न असोत अथवा निधीचा प्रश्न; त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पुढील काळात ‘सीपीआर’चे जे प्रश्न असतील, ते खासदार सोडवतील, अशी ग्वाही देत नेहमी चांगल्या कामाला यश मिळते, हे कोल्हापूर सर्किट बेंचला राज्य शासनाने दिलेल्या मंत्रिमंडळाच्या ठरावावरून दिसून येते, असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले.
डॉ. दशरथ कोठुळे म्हणाले, सेवाभाव, सदाचार व सत्कर्म केल्याने आपल्या जीवनात कमी पडत नाही. रुग्णालयात सध्या ६५५ खाटा आहेत; पण, परिचारिका, परिसेविका यांची अपुरी संख्या असली तरीही त्या काम करण्यामध्ये कमी पडत नाहीत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा हाश्मत हावेरी यांनी प्रास्ताविक केले.
समारंभास नेहा कापरे, भाग्यश्री शहा, जयश्री सौंदत्तीकर, निशा पारखे, सुजाता उरुणकर यांच्यासह उपाध्यक्ष संजीवनी दळवी, सरचिटणीस संदीप नलवडे, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर मुठे, मनोज चव्हाण, पूजा शिंदे, श्रीमंती पाटील, आदी उपस्थित होते.