होनेवाडीची सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:40+5:302020-12-30T04:31:40+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणुकीऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची ...

होनेवाडीची सलग पाचव्यांदा निवडणूक बिनविरोध होणार
आजरा : आजरा तालुक्यातील होनेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध होणार आहे. ग्रामस्थांनी निवडणुकीऐवजी गावच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. सुकाणू समितीने दिलेल्या निर्णयाप्रमाणे फक्त सातजणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
सरकारी लाभाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविलेले होनेवाडी गाव. १९९५ मध्ये आदर्श ग्राम योजना, तंटामुक्त अभियान व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार मिळवून तालुक्यात आदर्श असलेल्या होनेवाडी गावाचा उल्लेख प्रशासन पातळीवर केला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणताही वादंग नाही.
एकोपा ठेवून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक प्रभागानुसार सुकाणू समिती नेमण्यात आली. सुकाणू समितीचे सदस्य जाणकार व उमेदवारीची इच्छा नसणारे निवडण्यात आले.
सुकाणू समितीने प्रभागातील सदस्यांची बैठक घेतली. इच्छुकांची नोंदणी करून घेतली. मुलाखती घेतल्या, त्यातून उमेदवारांची नावे निवडण्यात आली. उमेदवारांचे अर्ज फक्त सातजणांचे भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे सोमवारी सातजणांनी अर्ज भरण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे सातजणांनी येऊन अर्ज दाखल केले. उमेदवारी न मिळालेल्या व्यक्तींनी नाराज न होता गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
होनेवाडीची मतदारसंख्या ७५० असून, प्रत्येक प्रभागात २५० ते २७० मतदार आहेत. प्रभाग १ व ३ मध्ये सर्वसाधारण पुरुष व सर्वसाधारण महिला, तर प्रभाग दोनमध्ये इतर मागास पुरुष, सर्वसाधारण महिला व इतर मागास महिला असे आरक्षण आहे.
यापूर्वी जनरल पुरुष व जनरल महिलेला सरपंचपदाची संधी मिळाली आहे. यावेळी सरपंचपदापेक्षा गावचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
होनेवाडी ग्रामस्थांनी सलग पाचव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून सर्व गावांसमोर आदर्श ठेवला आहे. निवडणुकीतून भांडण करण्यापेक्षा ग्रामस्थांचा एकोपा झाल्यास विकासकामे करणे शक्य आहे. जाणकार व समाजकार्य करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ग्रामस्थांनी संधी दिली आहे.