सोनगेत मंदिराच्या उभारणीसाठी राबणाऱ्या हातांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:00+5:302021-08-22T04:28:00+5:30
म्हाकवेः सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सोनगे (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केवळ दहा महिन्यांत ...

सोनगेत मंदिराच्या उभारणीसाठी राबणाऱ्या हातांचा सन्मान
म्हाकवेः सीमाभागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सोनगे (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केवळ दहा महिन्यांत करण्यात आला. कोणत्याही शासकीय निधीशिवाय लोकवर्गणी आणि श्रमदानातून गावकऱ्यांनी ६३ लाख २८ हजारांचा निधी उभा करत मंदिर उभारणीचे शिवधनुष्य पेलले. विशेष म्हणजे देवालय कमिटीने जमलेल्या निधीचा काटकसरीने सदुपयोग केला.
तसेच, मंदिर पूर्ण होताच गावकऱ्यांना बोलावून पै अन् पैचा हिशेबही सादर केला. यावेळी श्रमदान करणाऱ्या आणि बहुमूल्य योगदान देणाऱ्या तरुण मंडळाच्या युवकांसह नागरिकांचा सत्कार करत कमिटीने कृतज्ञताही व्यक्त केली.
स्वकमाईतील निधी आणि श्रद्धेपोटी राबणाऱ्या हजारो हातांमुळे मंदिराची ४८ बाय ५८ लांबीची देखणी वास्तू उभारण्यात आली. ना गटातटाचा लवलेश, जात ना पंथ, श्रीमंत-गरीब असा कोणताही बडेजाव न करता आबालवृद्ध मंदिरासाठी कार्यरत होते.
दगड-मातीचे असणारे ग्रामदेवतेचे मंदिर जीर्ण झाले होते. त्यामुळे शासकीय निधीच्या मागे न लागता गावकऱ्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदान करण्याचा निर्धार केला. लाॅकडाऊन असतानाही प्रशासनाचे नियम पाळत सर्वांनीच योगदान दिले. देवालय कमिटीने या सर्वच घटकांना सन्मानित केले.