पंतप्रधान आवास योजनेतून कामगारांना घरकुले द्यावीत
By Admin | Updated: January 24, 2017 00:18 IST2017-01-24T00:18:12+5:302017-01-24T00:18:12+5:30
इचलकरंजीत मागणी : कामगार संघटनेने प्रस्ताव देण्याच्या नगराध्यक्षांकडून सूचना

पंतप्रधान आवास योजनेतून कामगारांना घरकुले द्यावीत
इचलकरंजी : शहर व परिसरात यंत्रमाग उद्योगात असलेल्या कामगारांसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल योजना राबविण्यात यावी, अशी मागणी करवीर कामगार संघ-आयटक या संघटनेच्यावतीने नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी पंतप्रधान आवास योजनेतून कामगारांना घरे मिळावीत, अशा आशयाचा प्रस्ताव कामगार संघटनेने द्यावा, असे सूचित केले.
करवीर कामगार संघटनेच्यावतीने यंत्रमाग उद्योगातील कामगारांचा मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष मारुती आजगेकर व सचिव हणमंत लोहार यांनी केले. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चा नगरपालिकेवर आल्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आला. नगराध्यक्षा स्वामी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी यंत्रमाग कामगारांच्या घरकुल योजनेबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आजरेकर म्हणाले, शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने २ जानेवारी २०१२ रोजी केलेल्या शासन निर्णयात यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्याचे घोषित केले आहे. या योजनेचा फायदा यंत्रमाग कामगार, जॉबर, दिवाणजी, कांडीवाला, सायझर, वार्पर, हेल्पर,
फायरमन, वहिफणी कामगार, गारमेंट कामगार, वायडिंग कामगार, प्रोसेसर्स कामगार, घडीवाला, आॅटोलूम कामगार, आदींना मिळण्यासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शासनाकडून मंजूर होऊन आलेल्या प्रस्तावानुसार यंत्रमाग कामगारांना घरकुले बांधून
द्यावीत.
यानंतर नगराध्यक्षा स्वामी यांनी कामगारांना लवकरात लवकर घरकुले मिळण्यासाठी कामगार संघटनेने पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवून तो पुढे शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, नगरसेवक युवराज माळी, सागर चाळके, कामगार संघटनेचे महेश लोहार, शंकर आढावकर, वहिदा मुजावर, समीना गरगरे, नजमा दुरूगवाले, अशोक गोपलकर, रामचंद्र सौंदत्ते, ज्ञानदेव महादर, दादासाहेब जगदाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)