घरफाळा सवलत योजना महापालिकेची, प्रचार इच्छुकांकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:04+5:302021-02-05T07:09:04+5:30
कोल्हापूर : महापालिकेने घरफाळा दंड व्याजात भरघोस अशी सवलत योजना आणली आहे. या योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी महापालिका प्रयत्न ...

घरफाळा सवलत योजना महापालिकेची, प्रचार इच्छुकांकडून
कोल्हापूर : महापालिकेने घरफाळा दंड व्याजात भरघोस अशी सवलत योजना आणली आहे. या योजनांची माहिती नागरिकांना होण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहेच. मात्र, इच्छुकांकडून त्याचा अधिक प्रचार सुरू आहे. त्यांच्याकडून सोशल मीडिया आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातून योजनेची सविस्तर माहिती घरा्-घरापर्यंत पोहोचवली जात आहे. या माहितीसोबत स्वत:चा प्रचार करण्याचा अनोखा फंडा त्यांच्याकडून राबवला जात आहे.
कोरोनामुळे अनेकांना आर्थिक समस्या निर्माण झाली. महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. घरफाळ्याची १०० टक्के वसुली व्हावी आणि नागरिकांनाही सवलत मिळावी, या दुहेरी हेतून महापालिका प्रशासनाकडून घरफाळा दंडव्याजात भरघोस सवलत योजना आणली आहे. वास्तविक ही योजना नागरिकांना माहीत होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. ते करतही आहेत. मात्र, इच्छुकांकडून महापालिकेच्या योजनेचा लाभ मतदारांनी घ्यावा यासाठी सोशल मीडिया तसेच माहितीपत्रकातून योजनेची माहिती पोहोच करण्याचे काम सुरू केले आहे. मतदारांचेही याकडे आवर्जून लक्ष जाते. महापालिकेच्या योजनेच्या माहितीसोबत प्रभागातून इच्छुक असल्याचा संदेशही देण्यात ते यशस्वी होत आहेत. विशेष म्हणजे योजनेची सविस्तर माहिती देण्यात येत असून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले असल्याचेही यावर नमूद केले आहे.
चौकट
प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली. विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. प्रभागातील प्रत्येक घरात प्रचारपत्रक देऊन वातावरण निर्मिती केली जात आहे. एकाचवेळी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी साेशल मीडियाची मदत घेतली जात आहे. नववर्ष, संक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोनामध्ये केलेली मदत, प्रभागात केलेली विकास कामांची छायाचित्रेही व्हायरल केली जात आहेत. कोणत्याही खर्चाविना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार होत आहे.