गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST2021-03-18T04:24:47+5:302021-03-18T04:24:47+5:30

कोल्हापूर : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून भागणार नाही तर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ...

Home Minister Anil Deshmukh must resign | गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाच पाहिजे

गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाच पाहिजे

कोल्हापूर : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करून भागणार नाही तर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. वाझेंना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, राज्यात गेल्या वर्षभरात जे गुन्हे घडले त्यामुळे जनता भयभीत आहे. स्फोटके ठेवण्यामध्ये पोलीस अधिकारी सापडतो, रोज चार महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली गृहखात्याचा कारभार चालला आहे त्या अनिल देशमुख यांनी आता राजीनामा द्यावा. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांना पुढे केले जात असेल तर जे पुढे करणारे आहेत त्यांनी हिंंमत असेल तर पुढे यावे.

चौकट

लादेनचा बापच..

केवळ वाझेंवर कारवाई न केल्यामुळे अधिवेशन नऊ वेळा तहकूब करण्यात आले. आता पर्याय नाही म्हणून त्यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, वाझे लादेन आहे का.. आता लादेन आहे की लादेनचा बाप आहे हे तुम्ही बघा.

संजय राऊत यांना गृहमंत्री करा

मंत्रिमंडळातील एकही मंत्री बोलत नाही. परंतु संजय राऊत हेच प्रतिक्रिया देत आहेत. वाझे चांगला अधिकारी आहे, असेही राऊत म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता राऊत यांनाच गृहमंत्री करावे.

चौकट

कॉंग्रेस ही तर लिंबूटिंबू

या सर्व प्रकरणामध्ये कॉंग्रेस बिचारी ठरली आहे. कॉंग्रेस ही तर गेल्या वर्षभरातील या सत्ताकारणाच्या खेळामध्ये लिंबूटिंबू ठरली आहे असा टोला पाटील यांनी लगावला.

चौकट

बदल्यांबाबत न्यायालयात

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठे अर्थकारण झाले आहे. केवळ पैशाची बोली लावू न शकल्याने माझी बदली होऊ शकली नाही, अशी खंत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्याकडे व्यक्त केली. याबाबत मी न्यायालयात जाण्याचा विचार करत आहे.

Web Title: Home Minister Anil Deshmukh must resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.