होळी आज, धुलिवंदन सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST2021-03-28T04:22:13+5:302021-03-28T04:22:13+5:30
कोल्हापूर : आपल्यातील अनिष्ठ वाईट प्रवृत्तींना मागे सोडून चांगल्याचा स्वीकार करण्याची शिकवण देणारी होळी आज रविवारी सर्वत्र साजरी होत ...

होळी आज, धुलिवंदन सोमवारी
कोल्हापूर : आपल्यातील अनिष्ठ वाईट प्रवृत्तींना मागे सोडून चांगल्याचा स्वीकार करण्याची शिकवण देणारी होळी आज रविवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या टिमक्या आल्या आहेत. तर पर्यावरणप्रेमींनी व प्रशासनाने ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असा संदेश देत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी धुलिवंदन आहे; मात्र त्यादिवशी अनेकांचे उपवास असल्याने हा दिवसही आजच साजरा होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात येणाऱ्या होळीला दारात शेणी पेटवून नैवेद्य दाखवला जातो. टिमकी वाजवत पेटलेल्या होळीभोवती फिरताना समाजातील वाईट, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा व प्रवृत्ती नष्ट करून चांगल्याचा स्वीकार करण्याची कामना केली जाते. यानिमित्त घराघरात पुरणपोळीचा बेत असतो. यंदा होळी रविवारीच आली आहे, तर सोमवारी धुळवड आहे. उत्तर भारतीय नागरिक या दिवशी रंग खेळतात.
यंदा या सणावर कोरोनाचे सावट असल्याने महापालिका व जिल्हा प्रशासनाने हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच होळी लहान करून पर्यावरण वाचवा व पोळी दान करून भुकेल्यांना अन्न द्या, अशी साद घातली आहे.
--
फोटो नं २७०३२०२१-कोल-टिमक्या फोटो
ओळ : हिंदू धर्मातील होळी हा पारंपरिक सण आज रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त कोल्हापुरातील महापालिका परिसरातील बाजारपेठेत आकर्षक टिमक्या आल्या असून, त्या खरेदी करताना बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--