आरक्षण रद्दच्या अध्यादेशाची होळी
By Admin | Updated: March 7, 2015 01:04 IST2015-03-07T00:43:53+5:302015-03-07T01:04:16+5:30
मुस्लिम आरक्षण प्रश्न : कॉँग्रेसतर्फे निदर्शने : आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा

आरक्षण रद्दच्या अध्यादेशाची होळी
कोल्हापूर : आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा...हमारा हम लेके रहेंगे...फडणवीस सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कॉँग्रेसने शुक्रवारी तीव्र निदर्शने केली. निर्णयमागे न घेतल्यास येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाजप सरकारने मुस्लिम समाजाला मिळालेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा अध्यादेश काढला आहे. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. कालच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर यासंदर्भात आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दुपारी अडीच वाजता जिल्हा कॉँग्रेस व कॉँग्रेस जिल्हा अल्पसंख्याक विभागातर्फे दसरा चौकातील छत्रपती शाहू पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आरक्षण रद्द केलेल्या सरकारी अध्यादेशाची होळी केली. तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला. ‘आरक्षण द्या; नाही तर खुर्च्या खाली करा, हमारा हम लेके रहेंगे, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारप्रती आपला निषेध प्रकट केला. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, आर्थिक मागासलेल्या व असंघटीत असलेल्या मुस्लिम समाजासाठी कॉँग्रेसने हे आरक्षण दिले होते. राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पक्षाने हा निर्णय घेतला होता.परंतु भाजपा सरकारने आरक्षण रद्द करुन समाजावर अन्याय केला आहे. हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल.
यावेळी कॉँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष तौफिक मुल्लाणी यांचेही भाषण झाले.
आंदोलनात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, संपतराव चव्हाण-पाटील, महंमद शरीफ शेख, एस. के. माळी, शंभूराजे देसाई, रुपाली पाटील, राजू अत्तार, नौशाद मोमीन, जाफर मलबारी, अरीफ शेख आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)