वीज दरवाढ प्रस्तावाची सोमवारी होळी
By Admin | Updated: June 30, 2016 01:05 IST2016-06-30T01:03:14+5:302016-06-30T01:05:35+5:30
आंदोलनाचा कृती कार्यक्रम जाहीर : अन्यायकारक वाढीचा उद्योजक, ग्राहकांवर बोजा : प्रताप होगाडे

वीज दरवाढ प्रस्तावाची सोमवारी होळी
कोल्हापूर : महावितरणकडून केल्या जाणाऱ्या एकूण २७ टक्के वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी (दि. ४ जुलै) कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक होळी करणार आहेत. यात सर्व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक सहभागी होतील, अशी माहिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे (केईए) उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी बुधवारी येथे दिली. महावितरणची प्रस्तावित वीजदरवाढ ही राज्य शासनाच्या गेल्या २० महिन्यांतील सर्व आश्वासनांना हरताळ फासणारी आहे. या अन्यायकारक दरवाढीमुळे घरगुती, व्यापारी-उद्योजक, शेतकरी वीजग्राहकांवर बोजा पडणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.
महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीबाबत चर्चा करण्यासह त्याबाबतच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्योजकीय संघटनांतर्फे आयोजित बैठकीत ते बोलत होते. इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली. यात वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष होगाडे म्हणाले, महावितरणने ५.५ टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात एकूण २७ टक्के वाढ होणार आहे. या प्रस्तावात दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वीज आकार, स्थिर आकारात वाढीची मागणी करून एकूण चार वर्षांत वीजग्राहकांवर ५६,३७२ कोटी रुपयांचा दरवाढीचा बोजा लादला आहे. चार वर्षांत सहा टक्के, १३, २० आणि २७ टक्क्यांनी दर वाढणार आहेत.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास घरगुती, व्यापारी-उद्योजक, शेतकरी या वीजग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. ते लक्षात घेता सर्वांनी सामुदायिकपणे या प्रस्तावाला विरोध करणे आवश्यक आहे.
इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कोंडेकर म्हणाले, दरवाढीचा हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरातील उद्योजकीय संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्याची सुरुवात सोमवारी (दि. ४) वीज दरवाढ प्रस्तावाच्या होळीद्वारे केली जाईल. यादिवशी सकाळी ११ वाजता ताराबाई पार्कमधील महावितरणच्या कार्यालयासमोर उद्योजक जमून संबंधित प्रस्तावाची होळी करतील. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. या बैठकीच्या प्रारंभी होगाडे यांनी प्रस्तावित दरवाढीची कारणे, ती कशी होणार, तिचा कसा परिणाम होणार याची माहिती दिली. यानंतर उपस्थित उद्योजकीय संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व उद्योजकांनी आंदोलनाचा कृती कार्यक्रम निश्चित केला. यावेळी ‘गोशिमा’चे अध्यक्ष देवेंद्र दिवाण, संचालक राजीव परीख, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष राजू पाटील, ‘केईए’चे कमलाकांत कुलकर्णी, ‘मॅक’चे संचालक सचिन कुलकर्णी, सत्यजित पाटील, शंतनू गायकवाड, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष संजय पाटील, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स कुपवाडचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, चंदगड चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी, सतीश सावंत, उद्योजक जयकुमार परीख, शीतल केटकाळे, श्यामसुंदर मर्दा, जितूभाई गांधी आदी उपस्थित होते. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
अशी होणार दरवाढ
‘महावितरण’ची दरवाढ चक्रवाढ पद्धतीची असल्याचे होगाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, वीज आकारात पहिल्या वर्षी (२०१६-१७) ५.५ टक्के, दुसऱ्या वर्षी गेल्यावर्षीच्या वाढीव बेरजेवर ६.५५ टक्के, तिसऱ्या वर्षी मागील वर्षाच्या वाढीव बेरजेवर ६.५६ आणि चौथ्या वर्षी मागील वर्षाच्या वाढीव बेरजेवर ४.४४ टक्के वाढीची मागणी आहे. एकूण अंतिम दरवाढ साधारणत: २५ ते २७ टक्क्यांपर्यंत होणार आहे. ‘महावितरण’ची गळती, प्रशासनावरील खर्च यामुळे दरवाढीचा भर वाढत आहेत. राज्य सरकारने विदर्भ, मराठवाड्यासह डी आणि डी प्लस विभागातील उद्योगांना सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील डी आणि डी प्लस विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरातील उद्योगांना फारसा लाभ होणार नाही.