शिरोळ : लॉकडाऊन काळातील वीज बिले पंधरा दिवसात भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडले जातील, अशा नोटिसा महावितरणने औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना लागू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी नोटिसांची होळी करुन महावितरणच्या कार्यकारी अभियंता आवळेकर व उपअभियंता माने यांना नोटिसा मागे घ्याव्यात, अशी मागणी केली.
शासन जोपर्यंत वीज बिलात सवलत देत नाही तोपर्यंत कोणताही वीज ग्राहक लाईट बिल भरणार नाही, यावर ग्राहक ठाम आहेत. त्यामुळे महावितरणने जबरदस्तीने वीज बिले वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी कायदा हातात घेऊ. पण ग्राहकांची वीज कनेक्शन तोडू देणार नाही असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी चौक येथे संतप्त व्यावसायिकांनी एकत्र जमून महावितरणने पाठविलेल्या नोटिसांची होळी केली. यावेळी बी. जी. माने, आयुब मेस्त्री, श्रीकांत माने, सुरेश गंगधर, संजय चौगले, बाबासो कदम, संजय शिंदे, आप्पा पुजारी, दत्ता बारवाडकर, संतोष चुडमुंगे, योगेश जाधव, भानुदास माने, ज्ञानदेव माने, कृष्णा देशमुख उपस्थित होते.
फोटो - २१०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे वीज बिल नोटिसांची व्यावसायिकांकडून होळी करण्यात आली.