टोलनाक्यावर ट्रकचालकास मारहाण

By Admin | Updated: November 20, 2014 00:21 IST2014-11-20T00:13:19+5:302014-11-20T00:21:32+5:30

कळंबा टोलनाका : पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे सांगितल्यामुळे प्रकार

Hit the truck driver on tollnak | टोलनाक्यावर ट्रकचालकास मारहाण

टोलनाक्यावर ट्रकचालकास मारहाण

कोल्हापूर/ कळंबा : टोल भरा, नाहीतर पर्यायी मार्गाचा अवलंब करा, असे ट्रकचालकाला सांगितल्याने वाद होऊन कळंबा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना आज, बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने टोलनाक्यावरील प्लास्टिकचे बॅरिकेट्स उधळले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. हा प्रकार समजताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये ट्रकचालक नितीन राजाराम चव्हाण (वय २९, रा. कसबा वाळवे, ता.राधानगरी) हे जखमी झाले. या प्रकरणी नितीन चव्हाण यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याविरोधात, तर आय.आर.बी. कंपनीचा कर्मचारी संतोष रामचंद्र जांभळे (३६, रा. बालिंगा, ता. करवीर) याने ट्रकचालकाविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील टोलनाक्यावरील हा सलग दुसऱ्या दिवशीचा प्रकार आहे. काल, मंगळवारी शिरोली टोलनाक्यावर वाहनचालक-कर्मचाऱ्यांमध्ये अरेरावीचा प्रकार घडला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नितीन चव्हाण हे ट्रकचालक (एमएच ०९ सीओ ५५५३) हे दुपारी साडेचारच्या सुमारास ट्रक घेऊन कळंबा टोलनाका येथे आले. टोल भरण्यावरून कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने ते साईमंदिराकडून पर्यायी मार्गाने जाऊ लागले. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले. पुन्हा वाद होऊन कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांना मारहाण केली. यामध्ये त्यांची एक तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली व ते जखमी झाले. यामुळे वातावरण तंग झाले. हा प्रकार समजताच नागरिक जमा झाले. जमावाने बॅरिकेट्स हटवून संताप व्यक्त केला. हा प्रकार समजल्यावर करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, नगरसेवक मधुकर रामाणे घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. याप्रकरणी सायंकाळी नितीन चव्हाण यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याविरोधात, तर आय.आर.बी.चा कर्मचारी संतोष जांभळे यांनी, टोल भरा, नाहीतर पर्यायी रस्त्यावर जा म्हटल्यावर नितीनशी वाद झाला, अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

आज नाक्यावर ‘टोल समिती’...
शिरोली व कळंबा टोलनाक्यावर दोन दिवस वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहे. त्याची दखल घेऊन सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने उद्या, गुरुवारी दुपारी बारा वाजता हजर राहावे, असे आवाहन केले आहे.
दीड तास वसुली बंद...
ट्रकचालकाला मारहाण केल्यानंतर बुधवारी, दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही काळ कळंबा नाक्यावर टोलवसुली बंद होती. सहानंतर पुन्हा टोलवसुली सुरू झाली. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांची अरेरावी...
टोलनाक्यावर असलेल्या नागरिकांना बंदोबस्तासाठी असलेल्या नितीन चोथे या पोलिसाने तसेच इतर पोलिसांनी अरेरावीची भाषा केली. त्यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करताना नगरसेवक मधुकर रामाणे व नागरिक . कळंबा टोलनाक्यावर ट्रकचालक व कर्मचाऱ्यांच्या वादानंतर करवीर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक दयानंद ढोमेंसह पोलीस कर्मचारी.

Web Title: Hit the truck driver on tollnak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.