उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण

By Admin | Updated: August 23, 2015 00:31 IST2015-08-23T00:30:58+5:302015-08-23T00:31:53+5:30

खारेपाटण येथील प्रकार : रिक्षाचालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक, महामार्गावर थरार

Hit the production duty officers | उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण

खारेपाटण / कणकवली : दारू वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून खारेपाटण येथील रिक्षा अडविण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केला. खासगी गाडीतून आलेल्या साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याने त्यांना ‘लुटेरे’ समजून खारेपाटणवासीयांनी बेदम चोपले. शुक्रवारी रात्री महामार्गावर हा थरार घडला. याप्रकरणी खारेपाटण येथील अकराजणांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला बेकायदा दारू वाहतूक करीत असलेल्या संशयास्पद रिक्षाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे (वय ३६, रा. लांजा), कॉन्स्टेबल शेगर हे योगेश भिकाजी वाघदरे (३८) आणि महेश यशवंत देवरूखकर (२८) या दोन पंचांना घेऊन तळेरे येथे इर्टिगा कारमधून (एमएच ०८ झेड ३७३७) पाळत ठेवून होते. त्यांनी तळेरे येथून संशयास्पद रिक्षाचा पाठलाग केला. पाठलाग करतानाच रिक्षातील प्रवाशांनी फोन करून वारगाव येथे सहकाऱ्यांना बोलाविले. वारगाव येथे पथकाची इर्टिगा गाडी अडवून दहा ते पंधराजणांनी प्रमोद कांबळे यांच्यासह योगेश वाघदरे आणि महेश देवरूखकर यांना बेदम मारहाण केली. तसेच इर्टिगा गाडीही फोडण्यात आली. कॉन्स्टेबल शेगर यावेळी पळून गेला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारगाव येथे महामार्गावर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाला थांबवून खारेपाटण किती अंतर आहे, असे चालकाला विचारले. त्यानंतर नडगिवे घाटीनजीक पुन्हा रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारमधील एकाने रिक्षाचालकाच्या हातावर दांडा मारला. रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली असता प्रमोद कांबळे यांने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. तेव्हा रिक्षाचालकाने रिक्षा खारेपाटणच्या दिशेने पळविली. चालत्या रिक्षातून खारेपाटणमधील सहकाऱ्यांना बोलाविण्यात आले. महामार्गावर पटेल हार्डवेअर येथे इर्टिगा गाडी अडवून कारमधील प्रमोद कांबळे याच्यासह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ग्रामस्थांनीच यानंतर तिघांनाही खारेपाटण तपासणी नाक्यावर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा ते उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे आपल्या पथकासह खारेपाटण येथे दाखल झाले. उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि काही युवकांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले.
अकराजणांना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी रिक्षाचालक लवू रामचंद्र तेली याच्यासह किरण भीमाप्पा बेळगे, गणेश दत्तात्रय झगडे, दैवत अंकुश शेटये, मनोहर बंडू तेली, वीरेंद्र बाळकृष्ण चिके, प्रमोद विश्वनाथ निग्रे, नीलेश रामचंद्र पराडकर, रवींद्र श्रीरंग जाधव, साजन दशरथ मोहिते, विजय अंकुश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, गैरकायदा जमाव करून मारहाण करणे, आदी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील किरण बेळगे हा अल्पवयीन असल्याने त्याला सावंतवाडी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
लुटारू समजून मारहाण
वारगाव येथे रिक्षाला थांबवून तेथून खारेपाटण किती लांब आहे, असे साध्या वेशातील अधिकाऱ्यांनी विचारले. तेथून पुन्हा नडगिवे घाटीच्या अलीकडे इर्टिगामधील अधिकाऱ्यांनी देवस्थानाकडे गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीतील एकाने रिक्षाचालकाच्या हातावर दांडा मारला. तसेच रिक्षावर दांडा मारून काच फोडण्यात आली. अधिकाऱ्यांनी भाड्याची इर्टिगा गाडी आणली होती. अधिकारी साध्या वेशात होते. तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने ते लुटारू आहेत, असा सर्वांचा समज झाला आणि मारहाण केल्याचे खारेपाटणवासीयांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hit the production duty officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.