‘बहुजनपर्व’ उलगडणार नव्वद वर्र्षांचा इतिहास
By Admin | Updated: November 28, 2014 00:04 IST2014-11-27T23:45:47+5:302014-11-28T00:04:59+5:30
ग्रंथ प्रकाशन बुधवारी : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या समग्र माहितीचा समावेश

‘बहुजनपर्व’ उलगडणार नव्वद वर्र्षांचा इतिहास
कोल्हापूर : जातिभेदाची भिंत तोडल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही. मागासलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रथम राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याशिवाय अशा मुलांना शिक्षण मिळणार नाही; म्हणून शाहू महाराजांनी संस्थानकाळात २३ वसतिगृहे सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी सुरू केली. त्यांपैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचा नव्वद वर्षांचा इतिहास ‘बहुजनपर्व’ या ग्रंथरूपाने बुधवारी (दि. ३ डिसेंबर) सर्वांसमोर उलगडणार आहे.
या ग्रंथात नव्वद वर्षांतील संस्थेमधील शिकून गेलेल्या थोर व्यक्ती, अध्यक्ष, ज्यांनी संस्था उभारण्यासाठी मदत केली, त्यांच्याबद्दलची सम्रग माहिती जगासमोर पुस्तकरूपाने मांडली जाणार आहे.
१५ जुलै १९२० साली शाहू महाराज यांनी द्वितीय सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली व देशाची प्रगती केली. संस्थेच्या प्रगतीचा वेग आणि इतिहास आजच्या पिढीसमोर पुस्तकरूपाने यावा, यासाठी अध्यक्ष डी. बी. पाटील यांच्या पुढाकाराने ७५० पानांचा हा सम्रग ग्रंथ तयार केला आहे.
यामध्ये त्याकाळी मदत केलेल्या बाबूराव सासने, टी. वाय. भोईटे, सुबराव निकम, हौसाबाई जाधव, अण्णासाहेब मोरे यांच्याबरोबर प्राचार्य पी. बी. पाटील, पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, साहित्यिक आनंद यादव, हुतात्मा नारायण वारके, माजी कुलगुरू रामचंद्र कणबरकर, कॉम्रेड दत्ता देशमुख, गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, डॉ. बी. एम. हिर्डेकर, आदींनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. अशा एक ना अनेक दिग्गजांच्या कार्याचा आढावा या ग्रंथातून घेतला आहे. बुधवारी
(दि. ३) संस्थेचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथरूपी इतिहासाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी ग्रंथासाठी प्रस्तावना, ए. जी. वणिरे यांनी लेखन आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांनी संपादन केले आहे. (प्रतिनिधी)
वार लावून जेवण्याचा उल्लेख
त्याकाळी बहुजन समाजातील मुलांना शिकण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय होते. मात्र, या कॉलेजमध्ये केवळ शिक्षण घेता येत होते. राहण्यासाठी या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचाच आधार त्याकाळी मुलांना असे. अशा काळात या विद्यार्थ्यांना वार लावून जेवण्यासाठी ३२३ जणांनी मदत केली. त्यांच्याही नावांचा व कार्याचा उल्लेख या ग्रंथात आहे.
कोल्हापूर ही वसतिगृहांची माता
नाशिक येथे शाहू महाराज एका कार्यक्रमानिमित्त गेले असता भाषणात त्यांनी ‘कोल्हापूर ही वसतिगृहांची माता’ असल्याचा उल्लेख केला. त्यांच्याच दातृत्वामुळे कोल्हापुरात २३ वसतिगृहांची निर्मिती झाली. त्यापैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग एक आहे.