लढाऊ स्त्रियांंचीच इतिहासात नोंद
By Admin | Updated: January 16, 2017 00:47 IST2017-01-16T00:47:25+5:302017-01-16T00:47:25+5:30
पुष्पा भावे : जयसिंगराव पवार अमृतमहोत्सव समितीतर्फे एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

लढाऊ स्त्रियांंचीच इतिहासात नोंद
कोल्हापूर : युद्ध, सत्तास्पर्धेमुळे स्त्रीवादी विचार बाजूला पडले. यात राजवंशाच्या व तलवार घेतलेल्या ‘स्त्रिया’च पडद्यावर आल्या. त्यात समाज घडविणाऱ्या व राबणाऱ्या अन्य समाजांतील लढवय्या स्त्रियांना सन्मान मिळाला नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.
इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमृतमहोत्सव समितीतर्फे शाहू स्मारक भवन येथे रविवारी ‘भारतीय इतिहासातील स्त्रीअवकाशाचा शोध’ या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या बीजभाषणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते वसुधा पवार लिखित ‘डॉ. कृष्णाबाई केळवकर : जीवन व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
भावे म्हणाल्या, इतिहासलेखनाच्या अनेक पद्धती, शास्त्रे आहेत. तत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वर्गाने इतिहासाला प्रश्न विचारल्यानेच तळागाळातील माणसे, स्त्रियांच्या इतिहासाबद्दलचा नवा विचार सुरू झाला. आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांत मौखिक इतिहासाच्या प्रथम कल्पना मांडल्या गेल्या. इतिहासातील पुरावे देताना ताम्रपट, कागदपत्रे पुरेसे ठरत नाहीत. आजच इतिहास समुदायाने सांगितल्याप्रमाणे दिसतो. इतिहासाचे वाचन करताना स्थिर व लवचिक इतिहासाचे अंत:स्तर लक्षात घेतले पाहिजेत. त्या पुढे म्हणाल्या, स्त्रीवाद हा झोपडीपासून महालापर्यंत पसरलेला आहे. ब्राह्मणशाहीने दलित, भटक्या स्त्रियांचे वेगळे नीतिनियम तयार केले. १९ व्या शतकात स्त्रीस्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा झाली. १९७५ नंतर खऱ्या अर्थाने स्त्रीवादी चळवळी जास्त जोमाने पुढे आल्या. इतिहासात आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीला प्राधान्य दिले गेले आहे. त्यातून स्त्रियांना वगळलेले दिसले. खऱ्या लढवय्या स्त्रियांना यात स्थान दिल्याची नोंद नाही. यावेळी त्यांनी महाभारत, रामायण, आदींचे दाखले दिले. महिला निवडणुकीत विजयी झाल्यानंतर फेटा बांधतात. फेटा हे पुरुष सरंजामशाहीचे प्रतीक आहे. मात्र, फेटा बांधूनही स्त्रियांच्या हाती सत्ता किती असते, हा प्रश्नच आहे. आजही स्त्रियांकडे पाहण्याचा निरोगी दृष्टिकोन नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यसंग्रामासाठी ‘आझाद हिंद फौज’ उभारली. यात त्यांना देशाबाहेरील अडाणी स्त्रियांनी मदत केली; पण त्याची दखल इतिहासात घेतली गेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर हसिना फरास म्हणाल्या, कोल्हापूरचे नाव जगभर असून विविध क्षेत्रांत ते अग्रभागी राहिले आहे. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे माझ्यासारखी अल्पसंख्याक समाजातील स्त्री महापौर बनू शकली. डॉ. जयसिंगराव पवार यांचे इतिहासलेखन मराठ्यांच्या इतिहासापासून ते आधुनिक भारतापर्यंत विस्तारले आहे. तनुजा शिपूरकर यांनी स्वागत केले. आसावरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी डॉ. टी. एस. पाटील, डॉ. मेघा पानसरे, डॉ. अवनीश पाटील, तनुजा शिपूरकर, डॉ. अविनाश बागल, राजेश केळवकर, निहाल शिपूरकर, डॉ. मंजूश्री पवार, अरुंधती पवार, सुरेश पवार, व्यंकाप्पा भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.