पन्हाळा : इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे पन्हाळा पर्यटन महोत्सवात ऐतिहासिक शस्त्र - अस्त्र, नाणी व जुन्या मुद्रांकाचे प्रदर्शन पाहण्यासाठी इतिहासप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. हे प्रदर्शन शुक्रवारपर्यंत पाहण्यासाठी खुले ठेवले आहे.इतिहासप्रेमींना शिवकालीन शस्त्रांची माहिती मिळावी या उद्देशाने भडगाव इथल्या समाधान सोनाळकर यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन इंटरप्रीटेशन सेंटर येथे मांडण्यात आले आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे इथल्या शिवप्रसाद शेवाळे यांनी संग्रहित केलेले जुने मुद्रांक आणि नाण्याचे प्रदर्शन सोबत मांडण्यात आले आहे.इतिहासकालीन विविध आकाराच्या तलवारी, कट्यार, गुप्ती, चिलखत, जिरेटोप, उंदीर सापळा, कर्द, खंजीर अशा विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रांचे प्रदर्शन मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्धाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी प्रदर्शन पाहण्यास गर्दी करत असून त्यांना शिवप्रसाद शेवाळे व समाधान सोनाळकर माहिती देत आहेत.
Kolhapur: ऐतिहासिक शस्त्र, नाणी प्रदर्शनाने लक्ष वेधले, किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सवात आली रंगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:02 IST