अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक कठडा ढासळला
By Admin | Updated: March 24, 2015 00:12 IST2015-03-23T23:43:56+5:302015-03-24T00:12:08+5:30
पुरातत्त्व खाते कधी गंभीर ?

अंबाबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक कठडा ढासळला
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारातील रामाचा पार या वडाच्या झाडाखालील कठड्याची एक बाजू रविवारी रात्री ढासळली. अंबाबाई मंदिराच्या उत्तर दरवाजा येथील रामाचा पार नाव असलेल्या या कठड्याला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हजारो सुवासिनी परंपरागतरीत्या येथील वडाच्या झाडाची पूजा करतात. शिवाय येथे पूर्वी अनेक धार्मिक प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. अंबाबाई मंदिरातील या रामाच्या पाराची वेगळी ओळख आणि परंपरा आहे. हा पार वडाच्या झाडाभोवती बांधण्यात आला आहे. त्यामुळे झाडाची मुळे आणि पारंब्या यामुळे कठडा ठिसूळ झाला आहे. त्यामुळेच त्याची एक बाजू कोसळली. कठडा कोसळल्याचे कळताच परिसरातील भाविकांनी देवस्थान समितीच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली व लवकरात लवकर कठड्याची पूर्ववत बांधणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुरातत्त्व खाते कधी गंभीर ?
अंबाबाई मंदिराचे हेमाडपंथी दगडी बांधकामाची अडत काही ठिकाणी निघाली आहे, काही ठिकाणी पक्ष्यांनी घरे केली आहेत, झाडांची मुळे उगवली आहेत. पुरातत्त्व खात्याकडून मंदिराचे जतन करणे तसेच मंदिराच्या डागडुजीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कठड्याची माहिती विचारली असता व्यवस्थापक धनाजी जाधव यांनीही आम्ही वर्षभरापूर्वीच पुरातत्त्व खात्याला याबाबतची माहिती देऊन कठडा पुन्हा बांधणे गरजेचे असल्याचे कळवले आहे, असे सांगितले. मात्र, पुरातत्त्व खात्याने व देवस्थान समितीनेदेखील याची दखलच न घेतल्याचा परिणाम म्हणून कठडा ढासळला.