‘त्या’ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार रोखले

By Admin | Updated: November 8, 2014 00:25 IST2014-11-08T00:12:15+5:302014-11-08T00:25:22+5:30

‘लोकमत’चा दणका : विधानसभेच्या काळात कामावर न येताच घेत होते पगार

The 'hired' employees' salary was stopped | ‘त्या’ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार रोखले

‘त्या’ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार रोखले

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील दोन महिने कामावर दांड्या मारणाऱ्या दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार प्रशासनाने रोखले आहेत. हे दोन कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या काळात कामावरच येत नव्हते. आठ दिवसांतून एकदा येऊन सह्या करून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने ‘कामावर न येताच पगार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असताना त्यातील एक लिपिक व एक सुरक्षारक्षक असे दोन कर्मचारी कामावर न येताच पगार उचलत असल्याची चर्चा बाजार समिती वर्तुळात सुरू होती. हे दोन कर्मचारी जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मर्जीतील असल्याने प्रशासनही दबावामुळे या कर्मचाऱ्यांविरोधात बोलण्याचे धाडस करीत नव्हते; पण याविरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्येच अस्वस्थता होती. आम्ही राबायचे आणि या दोघांनी दांड्या मारुन आयता पगार घ्यायचा, हा कुठला न्याय, अशी विचारणा कर्मचाऱ्यांमधून व्हायची.
याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बाजार समितीचे अशासकीय मंडळ खडबडून जागे झाले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात दांड्या मारणाऱ्या आणि सही पुरते येणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा पगार रोखण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच चौकशी केली तेव्हा दोन कर्मचारी कामावर येत नसल्याचे लक्षात आले. संबंधितांचे हजेरीपत्रक घेऊन त्यांचा पगार रोखण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.
-प्रा. निवास पाटील, उपाध्यक्ष, अशासकीय मंडळ, बाजार समिती

Web Title: The 'hired' employees' salary was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.