झोपडपट्टीवासीयांचा आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: November 21, 2014 00:35 IST2014-11-21T00:11:42+5:302014-11-21T00:35:15+5:30
इचलकरंजी नगराध्यक्षांना निवेदन : घरकुले ताब्यात देण्याची मागणी

झोपडपट्टीवासीयांचा आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी : शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत बांधण्यात आलेली जयभीम व नेहरूनगर झोपडपट्टीमधील अपार्टमेंट पद्धतीची घरकुले अंतिम टप्प्यात आली असून, या इमारतींपैकी दोन इमारती पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना घरकुले ताब्यात द्यावीत; अन्यथा दोन आठवड्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सत्तारूढ कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते यांच्यासह चार नगरसेवकांनी आज, गुरुवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार हे उपस्थित होते.
शहरातील नेहरुनगर व जयभीम झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या झोपडपट्टीवासीयांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतींमध्ये घरकुले बांधून देण्यात येत आहेत. अत्यंत धिम्या पद्धतीने चालू असलेल्या या इमारतींपैकी काही इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून, इलेक्ट्रिक फिटिंग व सॅनिटेशनचे काम बाकी राहिले आहे. ही कामे तातडीने पूर्ण करुन नगरपालिकेने झोपडपट्टीवासीयांना या घरकुलांचा ताबा देणे आवश्यक आहे. मात्र, ही कामे प्रलंबित ठेवण्यात नगरपालिका पदाधिकारी व प्रशासन धन्यता मानीत असल्यामुळे झोपडपट्टीवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त ंहोत आहे.
पूर्णत्वास गेलेल्या इमारतींपैकी फक्त दोन इमारतींवरच हे काम पूर्ण करून त्यामध्ये लाभार्थ्याच्या हिस्स्याची रक्कम भरणाऱ्यांना अनुक्रमाने घरकुले ताब्यात द्यावीत, अशी मागणी नगरसेवक रजपुते, नगरसेवक भाऊसाहेब आवळे, नगरसेविका रेखा रजपुते व माधुरी चव्हाण यांनी नगराध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे केली.
यावेळी झालेल्या चर्चेत घरकुले ताब्यात देण्यास ६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. मात्र, नगरपालिकेने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. (प्रतिनिधी)