महामार्ग बनतोय असुरक्षित
By Admin | Updated: July 21, 2014 23:10 IST2014-07-21T22:59:40+5:302014-07-21T23:10:42+5:30
रात्री अडवून लूटमारीच्या संख्येत वाढ

महामार्ग बनतोय असुरक्षित
काशीळ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत रात्री एकट्या दुखट्या वाटसरूला अडवून लूटमार केली जात आहे. याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या कात्रज घाटापासून ते अगदी किणी वाठार ते अगदी कोल्हापूरपर्यंत हा महामार्ग पसरलेला आहे. यामुळे महामार्गावरील पेठ नाका, कोल्हापूर येथील कावळे नाका, कऱ्हाड, उंब्रज, सातारा जवळील महामार्ग परिसर, शिरवळ, भुर्इंज ठिकाणी मुंबई, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी सोयीस्कर ठरत आहेत. पहाटे चारपासून ते अगदी मध्यरात्री बारा ते एकपर्यंत वरील ठिकाणी प्रवाशांची तसेच वाहनांची बऱ्यापैकी वर्दळ असते. याचाच गैरफायदा घेत माणूस म्हणून जगणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी महामार्गावर लूटमारीचा धंदा सुरू आहे. महामार्गावरील वाहनांचा तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत पोलीस प्रसाशनापुढे आव्हान उभे केले.
महामार्गावर अनेक ठिकाणच्या अपघातामध्ये किड्या-मुंग्यासारखे माणसांचे जीव जात आहेत तर दुसरीकडे लूटमारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने पोलीस प्रशासनाचा महामार्गावरील रात्रगस्तीचा उपक्रम कुठेही उपयोगी पडत नसल्याने पोलिसांची रात्र गस्त म्हणजे काय रे भाऊ ? अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांसह वाहनधारकांवर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग जणू काही आपलाच या अविर्भावात आजही अनेक ठिकाणी महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल तसेच ढाब्यांवर रात्रीच्या वेळी अगदी रस्त्याच्या कडेला मोठे-मोठे कंटेनर, ट्रक उभे केलेले असतात. अशावेळी रात्रग्रस्त घालणाऱ्या पोलिसांना ही वाहने दिसत नसतील का? आजही रात्री अकरानंतर महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, पुढून बंद तर पाठीमागून चालू असून त्या-त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांना याची माहिती नसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
पोलिसांसमोर दरोडेखोरांच्या तपासाचे आव्हान
काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत अत्याचार झालेल्या मुलीने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची योग्य ती माहिती देत गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाडीचे योग्य वर्णन सांगितल्यानेच पोलिसांंना आरोपीच्या २४ तासांत मुसक्या आवळता आल्या. अशावेळी टोल नाक्यावर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे? अशातच मलकापूर, ता. कऱ्हाड येथील बँकेमध्ये रात्रीवेळी पडलेल्या दरोड्यामध्ये गुन्हेगारांचे दरोडा टाकतानाचे सीसीटीव्हीमध्ये अस्पष्ट चित्रीकरण झाले असल्याने दरोडेखोरांचा तपास लावण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे आहे. विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत असून निव्वळ शोपीस बनत आहेत.