उच्चशिक्षित तरुणीला अटक
By Admin | Updated: April 9, 2015 00:59 IST2015-04-09T00:52:43+5:302015-04-09T00:59:29+5:30
लॅपटॉप, दागिन्यांची चोरी : पुणे, कोल्हापूर येथील वसतिगृहांतील चोऱ्यांची कबुली

उच्चशिक्षित तरुणीला अटक
कोल्हापूर : शिक्षण व नोकरीचा बहाणा करीत मुलींच्या वसतिगृहांत राहून लॅपटॉप, पैसे व दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत उच्चशिक्षित तरुणीला बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. संशयित प्रियांका अशोक धनाले (वय २७, रा. नागरमन्नोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरी करून त्या चीजवस्तूंची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून ती ऐषारामीचे जीवन जगत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, आर. के. नगर येथील एस. एल. मुलींच्या वसतिगृहाच्या रूम नं. १०७ मधून दि. २० डिसेंबर २०१४ रोजी कोमल सूर्यकांत होगले (२२, रा. औरंगाबाद) हिचा लॅपटॉप व पैसे चोरीला गेले होते. यावेळी तिच्या रूममध्ये राहत असलेली प्रियांका धनाले गायब झाल्याने संशय बळावला होता. त्यामुळे कोमल होगले हिने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यापासून करवीर पोलीस तिचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी ती पुन्हा याच परिसरात फिरत असताना होगले हिला दिसली. तिने याची माहिती पोलिसांना दिला. पोलिसांनी मंगळवारी दुपारी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व रोख २ हजार ६०० रुपये हस्तगत केले.
संशयित प्रियांका धनाले हिचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ असून ती अनेक वर्षांपासून बाहेर पडली आहे. ती बी.ई. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्याचे सांगून आर. के.नगर येथील मुलींच्या वसतिगृहात राहण्यास आली होती. तेथून दोन दिवसांत चोरी करून ती गायब झाली होती. (प्रतिनिधी)
सोडविण्यासाठी धडपड
संशयित प्रियांका धनाले हिला करवीर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने कोल्हापुरातील स्थानिक महिला वकिलाला फोन करून आपणाला यातून सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी त्या वकील महिलेची करवीर पोलीस ठाण्यात लुडबुड सुरू होती. चोरी केल्यानंतर पोलिसांनी पकडल्यास पुढची तयारीही तिने करून ठेवल्याचे दिसून आले.
आई-वडिलांनी नाकारले
प्रियांका धनाले हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिचे मूळ गाव विचारून घेतले. त्यानुसार तिचे आई-वडील व भावाशी संपर्क साधून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ‘तिचे आम्हाला काही सांगू नका,’ असे म्हणून मोबाईल बंद करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.