‘रेंदाळ’ जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज’ मतदारसंघ

By Admin | Updated: February 15, 2017 23:47 IST2017-02-15T23:47:31+5:302017-02-15T23:47:31+5:30

बलाढ्य उमेदवार रिंगणात : अटीतटीने, रंगतदार व काटाजोड लढतीकडे लक्ष, नेत्यांचे राजकीय कसब पणास लागणार

'High Voltage' constituency of 'Rendal' district | ‘रेंदाळ’ जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज’ मतदारसंघ

‘रेंदाळ’ जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज’ मतदारसंघ

तानाजी घोरपडे -- हुपरी -रेंदाळ जिल्हा परिषद मतदार संघ हा जिल्ह्यातील सर्वात ‘हाय व्होल्टेज’ मतदारसंघ म्हणून ओळखण्यात येत आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र युवा नेते राहुल आवाडे व भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावणारे उद्योगपती महावीर गाठ. अशा दोन बलाढ्य उमेदवारांशी केवळ आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर निवडणुकीस सामोरे जात असलेले शिवसेनेचे सर्वसामान्य उमेदवार माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या मध्येच अटीतटीने, रंगतदार व काटाजोड लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
सन १९९७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी या मतदारसंघाची उभारणी करण्यात आली. त्या वेळेपासून म्हणजे गेल्या २0 वर्षांच्या कालावधीत केवळ मागच्या निवडणुकीवेळी या मतदारसंघावर अधिकार कुणाचा? या कारणावरून आवाडे-आवळे यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अपवाद वगळता या मतदारसंघावर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचेच वर्चस्व राहिले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी खासदार जयवंतराव आवळे, आदींनी वेगळी राजकीय खेळी करीत एक रणनीती आखून राजकीय चक्रव्युहात त्याना अडकविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र, आवाडे यांनीही तोडीस तोड अशी राजकीय खेळी करीत विरोधकांचे सर्वच मनसुबे धुळीस मिळवित आपले राजकीय कसब पणाला लावत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोबत घेत मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
या मतदारसंघात समावेश असणाऱ्या रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी व चंदूर या पाचही गावांतील आवाडे गटाचेच वर्चस्व असून, प्रत्येक गावात या गटाची चांगली ताकद आहे. सन २0१२ च्या निवडणुकीवेळी आवाडे-आवळे वादावरती कॉँग्रेस पक्षाने वेळीच योग्य निर्णय न घेतल्याने आयत्यावेळी उमेदवारांचा शोध घेऊन विचित्र पद्धतीने निवडणुकीस सामोरे जावे लागले होते. परिणामी, आवाडे गटाला दगा फटका बसल्याने शिवसेनेच्या सुमन मिणचेकर या विजयी झाल्या होत्या. हा अनुभव लक्षात घेऊन माजी मंत्री आवाडे यांनी यावेळी कॉँग्रेस पक्षाचा नाद सोडून कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपले पुत्र नव महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल याना प्रत्यक्ष निवडणुकीत उतरवून त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात येथून केली आहे. त्यांच्या जोडीला चंदूर पंचायत समिती मतदारसंघातून माजी सभापती महेश पाटील व रेंदाळ पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार उभा करून आपल्या गटाची भक्कम अशी मोट त्यानी बांधली आहे.
आवाडे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी एक वेगळी राजकीय खेळी करीत हुपरीचे उद्योगपती महावीर गाठ यांना सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरविले आहे. चंदूर येथील शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांची राजकीय ताकदही मिळवून दिली आहे .


आपल्या सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्याच्या जोरावर रेंदाळचे दोनवेळा सरपंचपद भूषविण्याबरोबरच ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता संपादित करणारे, तसेच संपूर्ण राज्याला आदर्शवत वाटेल अशी जलस्वराज्य योजना राबवून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा गावचा पाणी प्रश्न सोडविण्याचे कौशल्य दाखविणारे शिवाजीराव पाटील हे शिवसेनेच्या उमेदवारीवर आपले नशीब आजमावित आहेत. युवा नेते राहुल आवाडे व उद्योगपती महावीर गाठ यांच्या तुलनेत शिवाजीराव पाटील हे अगदीच सर्वसामान्य उमेदवार आहेत. मात्र, त्यांच्या गावविकासाच्या कामावर लक्ष टाकल्यास व ही कामे मतदारांनी खरोखरच मनावर घेतली, तर समोरील विरोधी उमेदवाराला चारिमुंडया चित करेल, अशी त्यांची ताकद असल्याचे निदर्शनास आल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या जोडीला रेंदाळ पंचायत समितीसाठी यळगूडच्या राणी वासुदेव घुणके व चंदूर पंचायत समितीसाठी रांगोळीचे शिवाजी सादळे उभे आहेत.



रेंदाळ पंचायत समितीची उमेदवारी भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांच्या पत्नीला देऊन पक्ष कार्यकर्त्यांनाही मैदानात उतरविले आहे.

Web Title: 'High Voltage' constituency of 'Rendal' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.