पतंगांची उंच भरारी
By Admin | Updated: November 29, 2015 00:55 IST2015-11-29T00:55:29+5:302015-11-29T00:55:29+5:30
१९० शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला

पतंगांची उंच भरारी
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण मंडळ, महापालिका व पैलवान बाबा महाडिक पतंगप्रेमी गु्रपच्यावतीने शनिवारी सकाळी शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित पतंग उत्सवात शहरातील १९० शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
सहभागी विद्यार्थ्यांना तीन हजारांवर पतंगांचे वाटप केले. सकाळी आठपासून अनेक शाळांमधील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. रंगीबेरंगी पतंगांमुळे मैदानात जणू रंगांचीच उधळण दिसून येत होती. यात कोणी पतंगाचे दोर धरले होते, तर कोणी पतंग उडविण्यास आपल्या सहकारी विद्यार्थ्याला मदत करीत होता. सहकुटुंब येण्याचे आवाहन केल्याने काही पालकही पाल्यांना घेऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटत होती.
महोत्सवाचे उद्घाटन यशवीर महाडिक या मुलाच्या हस्ते करण्यात आले. माजी उपसभापती समीर घोरपडे, पैलवान बाबा महाडिक, छावा संघटनेचे राजू सावंत, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, उमेश चोरगे, क्रीडाधिकारी सचिन पांडव, विजय माळी, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.
पतंग उडविण्याची मजा महिलांनीही लुटली
आपल्या नातवाच्या आग्रहाखातर एका मुस्लिम आजीनेही पतंग उडवत हा अनुभव घेतला. या महिलेसह आपल्या मुलांच्या आग्रहाखातर अनेक महिलांनीही या महोत्सवात भाग घेत मोकळ्या मैदानात पतंग उडविण्याची मजा छोटे होऊन लुटली. (प्रतिनिधी)