उच्चशिक्षित तरुणींचा वाढला कल!
By Admin | Updated: March 9, 2015 23:45 IST2015-03-09T23:37:38+5:302015-03-09T23:45:45+5:30
मोडणार पारंपरिक पायंडा : दुसऱ्या दिवशीही महिलांनी केली भरती प्रक्रियेची विचारपूस

उच्चशिक्षित तरुणींचा वाढला कल!
सातारा : सामाजिक आरक्षणानुसार राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी चालक भरतीत २,२५३ जागा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, उमेदवार न मिळाल्याने दरवेळी निराशा येत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीमध्ये जनजागृती केल्याने दोन दिवसांपासून महिलांनी फोन करून भरती प्रक्रियेची माहिती घेत होत्या. यामध्ये उच्चशिक्षित तरुणींची संख्या मोठी आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून वेळोवेळी चालक-वाहकांची भरती केली जाते. मात्र, आजवर भरती झालेल्या उच्चशिक्षित तरुणांची संख्या मोजकीच आहे. त्याला कारणीभूत सामाजिक परिस्थितीच होती. शिक्षणाकडे लक्ष नाही किंवा घरची जबाबदारी आल्याने तरुण मंडळी ओळखीकडेच वाहन चालवायला शिकत. त्याठिकाणीच नोकरी करून उदरनिर्वाह करत होते. चालक परवाना काढण्यासाठी आठवी पासची अट आहे. त्यामुळे केवळ एसटीत भरती व्हायचे म्हणून कित्येकजण मुक्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण होत होते. त्यामुळे एसटीत भरती झाले तरी त्यांच्या मानसिकतेत फारसा बदल होत नव्हता.
चालक-वाहक प्रवाशांशी हुज्जत घालतात, अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे कार्पोरेट क्षेत्रात काम करत असलेले प्रोफाईल मंडळी एसटीपासून दुरावत होते. त्यामुळे महामंडळाने उच्चस्तरावरून ‘अभिवादन’ उपक्रम राबविला होता. मात्र, त्यालाही चालक-वाहकांमधून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत एसटीचे अधिकारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करत आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने महिलांसाठी एसटीचे क्षेत्र खुणावत असल्याची जाणीव करून दिली होती. विमान, रेल्वे चालविणारी रणरागिणी एसटीपासून दूर का? यासंदर्भात जनजागृती केल्यानंतर दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला फोन करून भरती प्रक्रियाची माहिती घेत होत्या. त्यासाठी आवश्यक पात्रता, प्रशिक्षण कोठे घेता येते, याची विचारणा करत होत्या. एसटीचे स्टिअरिंग हाती घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित तरुणींची संख्या मोठी आहे.
सर्वसाधारणत: बारावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेल्या महिला यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अल्पशिक्षित चालक ही चाकोरी मोडीत काढली जाणार, हे निश्चित. अन् एसटी प्रशासनालाही हेच अपेक्षित असल्याचे यापूर्वी राबविलेल्या विविध उपक्रमांवरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
महिला वाहकांनाच
अधिक उत्सुकता
वाहकपदी शेकडो तरुणी काम करत आहेत. एसटी घेऊन त्या दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. मात्र, चालक पुरुष असल्याने अनेकदा गैरसोयच होत आहे. तरीही त्या कर्तव्य बजावत आहेत. महिला वाहक भरती झाल्यास चांगले सूर जुळतील, अशा भावना अनेक महिला वाहकांनी ‘लोकमत’शी‘ बोलताना व्यक्त
केल्या.