निवडणूक हाय व्हय..?
By Admin | Updated: October 12, 2014 00:53 IST2014-10-12T00:49:41+5:302014-10-12T00:53:46+5:30
पक्ष, उमेदवारांबाबत मतदारच अनभिज्ञ : जतमधील वाड्यावस्त्यांवरील चित्र

निवडणूक हाय व्हय..?
संतोष मिठारी / जत
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील दिग्गजांच्या सभा, पदयात्रा, मेळावे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा सर्वत्र धुरळा उडत आहे. प्रचाराची सांगता होण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या जत (जि. सांगली) तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांवरील मतदार निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पक्ष आणि उमेदवारांबाबत अनभिज्ञच असल्याचे चित्र आहे.
तालुकयात १२३ गावे आणि २७६ वाड्यावस्त्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, जतमधील सुमारे दोनशेहून अधिक वाड्यावस्त्यांमधील बहुतांश मतदारांना कोणती निवडणूक आहे, निवडणुकीत कोणते पक्ष आणि कोणते उमेदवार उतरले आहेत, याची कल्पनाच नसल्याचे चित्र आहे. तालुका पातळीवरील बाजाराच्या ठिकाणी, बऱ्यापैकी असलेल्या डांबरी रस्त्यांवर उमेदवाराचे नाव, केलेल्या कामांची माहिती ध्वनिवर्धकावरून देत दिवसांतून तीन-चारवेळा फिरणाऱ्या झेंडे, बॅनर लावलेल्या चारचाकी दिसतात. मात्र फोंडामाळ, खडकाळ रस्ते असलेल्या तसेच ४०-५० कुटुंब असलेल्या वाड्यावस्त्यांवर प्रचार पोहोचलेला नाही. कोकरेवाडी, साळमळगेवाडी, पसारवाडी, कुडाळवाडी, टोणेवाडी आदी वाड्यावस्त्यांवरील अधिकतर वृध्द महिला-पुरूष मतदारांना निवडणुकीची कल्पनाच नाही. बनाळीकडून कोकरेवाडीतील घराकडे निघालेल्या एका महिलेला निवडणुकीबाबत विचारले असता तिने ‘निवडणूक हाय व्हय’ असा सवाल केला आणि ‘असंलच निवडणूक, तर घरातील सांगतील त्यावर मारायचा शिकका’, असे उत्तर दिले. सुशिक्षित लोक सांगतील त्यालाच मतदान करायचे, असा अलिखित नियमच घालून घेतला आहे.