‘दौलत’ला विरोधाचे ‘हेमरस’ कनेक्शन : मुश्रीफ
By Admin | Updated: July 12, 2015 00:16 IST2015-07-12T00:14:09+5:302015-07-12T00:16:16+5:30
‘दौलत’चे राजकारण : ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांवर आरोप

‘दौलत’ला विरोधाचे ‘हेमरस’ कनेक्शन : मुश्रीफ
कोल्हापूर : ‘दौलत’ शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, तो चालविण्यास द्यावा, अशी आता ओरड करणारे गेले चार वर्षेे कोठे होते, असा सवाल करत बॅँकेच्या प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांचे ‘हेमरस’ कनेक्शन असल्याचा आरोप जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांना ‘हेमरस’ सुरू ठेवायचा आहे आणि जिल्हा बॅँकेला अडचणीत आणायचे असल्याचे सांगत ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केले.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी बऱ्याचवेळा निविदा काढूनही कोणी प्रतिसाद दिलेला नाही. तरीही चंदगडच्या शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा निविदा काढणार असून, त्याला आठ दिवसांची मुदत देणार आहे. जो कोणी बॅँकेच्या थकीत रकमेपैकी ५० टक्केपेक्षा जास्त रक्कम भरेल व उर्वरित रक्कम दोन वर्षांत देईल, त्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. नाबार्डकडून दोनवेळा मूल्यांकन करून घेतले, तरीही नरसिंगराव पाटील यांना शंका होती. त्यामुळे तिसऱ्यांदा मूल्यांकन केले आहे. ‘दौलत’ शेतकऱ्यांच्या मालकीची राहावी, यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करत आहे. कर्मचारी भिकेला लागले आहेत, शेतकरी अडचणीत सापडला असताना काही मंडळींनी गेले चार वर्षे बघ्याची भूमिका घेतली. इकडे ‘हेमरस’ सुरू राहावा व तिकडे जिल्हा बॅँक अडचणीत यावी, असा दुहेरी डाव काही मंडळींचा आहे.