महिला, बालसुधारगृहातील शोषण रोखण्यास ‘हेल्पलाईन’
By Admin | Updated: January 1, 2015 00:25 IST2015-01-01T00:24:24+5:302015-01-01T00:25:43+5:30
विद्या ठाकूर : नव्या सरकारने महिलांसंदर्भातील उचलले पहिले पाऊल

महिला, बालसुधारगृहातील शोषण रोखण्यास ‘हेल्पलाईन’
कोल्हापूर : महिला व बालसुधारगृहातील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सुधारगृहांतील शोषण रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच ही हेल्पलाईन सुरू केली जाईल. नव्या सरकारने महिलांसंदर्भातील हे पहिले पाऊल उचलले आहे, अशी माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी आज, बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
ठाकूर म्हणाल्या, भाजप युती सरकार सत्तेवर येऊन दोन महिने होत आहेत. या सरकारने महिलांसाठी विविध संकल्प केले आहेत. महिला व बालसुधारगृहात शोषणासारखे होणारे प्रकार व तेथील इतर तक्रारींसंदर्भात स्वतंत्र योजना करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. त्यामध्ये तक्रारींसंदर्भात ‘हेल्पलाईन’ सुरू केली जाणार आहे. या ‘हेल्पलाईन’द्वारे या संदर्भातील तक्रारी समोर येण्यासाठी मदत होईल. कुपोषण प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्त्री भ्रूणहत्या हा सामाजिक विषय असून तो सरकारपुरता मर्यादित नाही. त्यासाठी सर्वांनी समाजप्रबोधन करून हा प्रकार रोखला पाहिजे. घरातील मोठ्या पुरुष मंडळींनीही यामध्ये पुढे आले पाहिजे. येणाऱ्या काळात या प्रश्नावर मात करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची गरज आहे.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, शिवाजी बुवा, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या थकलेल्या वेतनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ते लवकरच देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांवरील बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचा कक्ष तयार केला जाईल. आरोपीवर तत्काळ कारवाई होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.