मदतगारांनाच ‘संधी’ गद्दारांचा ‘विचार’ करू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2015 01:08 IST2015-11-30T00:42:40+5:302015-11-30T01:08:28+5:30
नंदिनी बाभूळकर : गडहिंग्लज कारखाना निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट

मदतगारांनाच ‘संधी’ गद्दारांचा ‘विचार’ करू !
नेसरी/गडहिंग्लज : शेतकऱ्यांचे हित व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा सन्मान हेच सूत्र आणि स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या विचारानेच गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत भूमिका घेतली जाईल. विधानसभेला ज्यांनी मदत केली त्यांनाच संधी आणि गद्दारी केलेल्यांचा ‘विचार’ केला जाईल, असा इशारा डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी दिला.
कानडेवाडी येथे गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी बी. एन. पाटील होते.
बाभूळकर म्हणाल्या, ब्रीसक् कंपनी कारखान्याचा आर्थिक व्यवहार पाहील. मात्र, शेतकऱ्याचं हित व सभासदांची मालकी जपण्यासाठी नि:स्वार्थी आणि हक्काचं संचालक मंडळ हवं. गाव तिथे राष्ट्रवादी आहे. त्यामुळेच या निवडणुकीतही नक्कीच यश मिळेल.
संध्यादेवी म्हणाल्या, गडहिंग्लज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच भूमिका घेतली जाईल.
जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी म्हणाले, कारखान्यातील पहिल्या सत्तांतरापासून प्रत्येक निवडणुकीत स्व. कुपेकरांच्या शब्दावरच सभासदांनी विश्वास टाकला. मात्र, ज्यांना नेतृत्वाची संधी दिली, तेच उलटे गेले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच संधी मिळते, याचा विसर पडू नये.
जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी म्हणाले, अवर्षणग्रस्त भाग असूनही पूर्वभागातील ऊस वेळेत जात नाही. एका ट्रॅक्टरच्या बाँडसाठी मुश्रीफ यांच्याकडे चारवेळा गेलो तरी काम झाले नाही. यावेळी जयसिंग चव्हाण , सतीश पाटील, माजी सभापती अमर चव्हाण यांनी मनोग व्यक्त केले. यावेळी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार केल्याबद्दल नंदाताई बाभूळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, नारायण चव्हाण, अनिल पाटील, बी. वाय. पाटील, गणपतराव थोरात, रवींद्र आसवले, तुकाराम वार्इंगडे, जितेंद्र शिंदे, मंजूषा कदम यांचीही भाषणे झाली. बैठकीस उपसभापती तानाजी कांबळे, महाबळेश्वर चौगुले, मुन्ना नाईकवाडे, जनार्दन बामणे उपस्थित होते.
संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढणार
आगामी निवडणूक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यंदाच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी केली आहे. मात्र, ७० टक्के सभासद चंदगड मतदारसंघात असल्याचा वारंवार उल्लेख करून ही निवडणूक संध्यादेवींच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल, असे बहुतेक वक्त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.