लोकांच्या मदतीमुळे कोरव्याचा राहुल बनला इंजिनिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:22+5:302020-12-05T04:59:22+5:30

सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्याला मदत करणे हा माणुसकीचा धर्म होय. लोकमत, ...

With the help of people, Rahul became an engineer | लोकांच्या मदतीमुळे कोरव्याचा राहुल बनला इंजिनिअर

लोकांच्या मदतीमुळे कोरव्याचा राहुल बनला इंजिनिअर

सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्याला मदत करणे हा माणुसकीचा धर्म होय. लोकमत, संजीवनी नाॅलेजसिटी, उमेद फौंडेशन आणि पोर्लेकरांच्या माणुसकीतून राहुल कोरवीने अंतिम वर्षात ९४ टक्के गुण मिळवून मेकॅनिकेल इंजिनिअरची पदवी मिळवली. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे चीज होते हे राहुल कोरवी याने आपल्या शैक्षणिक प्रवासातून दाखवून दिले; परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणाला तेव्हाच न्याय मिळेल, जेव्हा त्यांच्या हाताला आर्थिक सक्षमतेचा रोजगार मिळेल.

भटक्या विमुक्त समाजाशी निगडित असणाऱ्या कोरवी कुटुंबाचा गरिबीशी झगडत पोर्ले तर्फ ठाणे गावात गेल्या वीस वर्षांपासून बुरूड व्यवसाय सुरू आहे. मिळकतीतून घरखर्च भागवून उरलेल्या पैशांतून राहुलच्या डिप्लोमासह भावाचे शिक्षण सुरू आहे. राहुलने इंजिनिअरिंग करत आईवडिलांना व्यवसायात मदत केली. मेकॅनिकेल डिप्लोमातून चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या राहुलच्या पदवीच्या शिक्षणात गरिबीचा अडथळा होता. तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने ‘राहुल पदवीच्या शिक्षणासाठी मुकणार’ या मथळ्याखाळी बातमी प्रसिद्ध करून त्याची स्थिती मांडली होती. या वृत्ताची दखल घेत पन्हाळा संजीवनी नाॅलेज सिटीने प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात राहुलच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत डोनेशन आणि बसभाडे माफ करून त्याच्या शैक्षणिक उमेदीला बळकटी दिली. त्याची तीन वर्षांची शासकीय प्रवेश फी, परीक्षा फी आणि इतर खर्चाचा प्रश्न बिकट असताना गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करीत सामुदायिक सामाजिक बांधीलकी जपली. त्याने गरिबीची जाणीव मनात ठेवून पहिलीपासून प्रत्येक वर्गात गुणवत्ता यादीत येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली.

राहुलने केवळ गरिबीवर मात करण्यासाठी जिद्द आणि महत्त्वाकांक्षा मानत बाळगून इंजिनिअरिंग पूर्ण केले. गरिबी यासह अन्य कारणांनी काथ्या कुटत उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहुल कोरवीचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी नक्कीच आहे.

चौकट-

अनेकांच्या मदतीचे हात

राहुलची शैक्षणिक धडपड पाहून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. उमेद फौडेशनने त्याला आणि त्याच्या भावाला शैक्षणिकदृष्ट्या सर्वतोपरी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते राम पाटील आणि लेखक चंद्रकुमार नलगे यांनी आर्थिक मदत करीत त्याच्या शैक्षणिक धडपडीचे कौतुक केले. यासह अन्य लोकांनी राहुलला वेळाेवेळी मदत करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणा दिली.

चौकट

भटक्या विमुक्त जमातीत अजूनही शैक्षणिक उठाव दिसून येत नाही. परंपरागत व्यवसायाला या समाजात प्राधान्य असते. त्यामुळे गावाेगावी व्यवसायानिमित्त भटकंती होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि या समाजातील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावलेला दिसून येत नाही. राहुलसारखी अनेक गुणवान मुले गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिली आहेत; परंतु परिस्थितीबाबत काथ्या कुटणाऱ्यांसाठी राहुल कोरवी एक आदर्श आहे.

- राहुल कोरवी

Web Title: With the help of people, Rahul became an engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.