मित्रांच्या लाखमोलाच्या मदतीने शेंडगे कुटुंबीय गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:59+5:302021-07-12T04:15:59+5:30
कोल्हापूर : मित्रप्रेमापोटी जमविलेले पावणेचार लाख रुपये स्वीकारताना दिवंगत हरहुन्नरी कलाकार प्रफुल्ल शेंडगे यांचे कुटुंबीय गहिवरले. जड अंत:करणाने मित्रांनी ...

मित्रांच्या लाखमोलाच्या मदतीने शेंडगे कुटुंबीय गहिवरले
कोल्हापूर : मित्रप्रेमापोटी जमविलेले पावणेचार लाख रुपये स्वीकारताना दिवंगत हरहुन्नरी कलाकार प्रफुल्ल शेंडगे यांचे कुटुंबीय गहिवरले. जड अंत:करणाने मित्रांनी एका मित्राच्या कुटुंबीयांच्या काळजीपोटी जमा केलेली ही लाखमोलाची मदत रविवारी छोटेखानी कार्यक्रमात सुपुर्द करण्यात आली. यावेळी सर्वांचेच मन भरून आले आणि डोळेही पाणावले; पण यानिमित्ताने मैत्रीला जागण्याचा आणि एका कलाकारासाठी दानशूरांनी मदतीचा हात रिता करण्याच्या काेल्हापूरच्या दातृत्वाची परंपरा पुन्हा एकदा वृद्धिंगत झाली.
राजारामपुरीत राहणाऱ्या प्रफुल्ल शेंडगे या कलाकाराचे २ मे रोजी हृदयविकाराने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी असल्याने त्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता; पण शेंडगे यांनी जमविलेला मित्रांचा गोतावळा व जोडलेली माणसे धावून आली आणि त्यांनी वर्गणीच्या माध्यमातून केवळ २५ दिवसांत तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये जमा केले. ही रक्कम देवल क्लबमध्ये रविवारी सकाळी कुटुंबीयांकडे देण्यात आली. माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते शेंडगे यांच्या पत्नी अरुणा, मुलगी आरोही आणि मुलगा प्रतीक यांच्याकडे बचतपत्र व पोस्ट सेव्हिंगचे पत्र सुपुर्द करण्यात आले.
यावेळी सचिन थोरात, दिनेश माळी, नितीन सोनटक्के, सूरज नाईक, संदेश गावंदे, प्रसाद जमदग्नी, राजेंद्र कोरे, बाळ डेळेकर, कुमार पाटील, राम भोळे, प्रवीण केसरकर, अभिजित देवधर, प्रदीप राठाेड, श्रीकांत पोतनीस उपस्थित होते.
फोटो : ११०७२०२१-कोल-कलाकार मदत
फोटो ओळ : कोल्हापुरातील प्रफुल्ल शेंडगे या तरुण कलाकाराच्या अकाली मृत्यूने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांना त्याच्याच मित्रांनी वर्गणीच्या रूपाने जमा केलेली पावणेचार लाखांची मदत रविवारी देवल क्लबमध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते शेंडगे यांच्या पत्नी अरुणा, मुलगी आरोही व प्रतीक यांनी स्वीकारली.
(छाया : नसीर अत्तार)